आंध्रात अग्निप्रलयात 6 मजुरांचा मृत्यू
केमिकल फॅक्टरीमध्ये वायू गळतीनंतर दुर्घटना : 13 जण जखमी
हैदराबाद / वृत्तसंस्था
आंध्रप्रदेशातील एलुरु राज्यातील कृष्णा जिह्यातील मुसुनुरू गावात असलेल्या एका रासायनिक कारखान्यात बुधवारी मध्यरात्रीनंतर आगीची भीषण दुर्घटना घडली. या आगीत 6 मजुरांचा होरपळून मृत्यू झाला आहे. याशिवाय 13 जण जखमी झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्यपालांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबियांना भरपाईही जाहीर केली आहे.
एलुरु येथील पोरस प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्यात वायूगळतीनंतर आगीचा भडका उडाला. कंटेनरला गळती लागल्याने कारखान्यात आग लागली. काही वेळातच आगीने संपूर्ण कारखान्याला वेढले. सदर कंटेनतर या कारखान्यात पॉलिमरचा कच्चा माल घेऊन दाखल झाला होता, असे पोलिसांनी सांगितले. कारखान्यामध्ये कंटेनर लीक झाला आणि मॅनहोलमधून अचानक आगीच्या ज्वाला निघाल्या. त्यानंतर एकूण पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. या अपघातात 13 जण जखमीही झाले आहेत.
अपघाताच्या वेळी कारखान्यात 18 लोक काम करत होते. जखमींना विजयवाडा आणि नुजीवेडू येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या आगीत कारखान्याचे दोन मजले पूर्णपणे जळून खाक झाले आहेत. मृतांपैकी चार जण बिहारचे रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पंतप्रधान मोदींनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. पीएमओच्या ट्विटर अकाउंटवरून शोकसंदेश ट्विट करण्यात आला आहे. तसेच राज्याचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी वारसांना नुकसान भरपाई जाहीर केली आहे. रेड्डी यांनी मृतांच्या नातेवाईकांना 25 लाख रुपये, गंभीर जखमींना 5 लाख रुपये आणि किरकोळ जखमींना 2 लाख रुपये देण्याची घोषणा केली. आंध्र प्रदेशचे राज्यपाल बिस्वभूषण हरिचंदन यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे.