‘ओला’ स्कूटरकडे दररोज 6 ते 7 हजार तक्रारी
कर्मचाऱ्यांची भासते कमतरता : महिन्यात 80,000 पर्यंत तक्रारी
नवी दिल्ली :
इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये आघाडीवरची कंपनी ओलाला सध्या एका वेगळ्या कठीण प्रसंगाला सामोरी जात आहे. कंपनीला दररोज 6,000 ते 7,000 इलेक्ट्रिक स्कूटर्सबद्दल तक्रारी येत आहेत, ज्या एका महिन्यात 80,000 इतक्या आहेत. या तक्रारी केवळ गैरप्रकारांमुळेच नाहीत तर ग्राहक सेवेच्या अनुभवावरही प्रश्नचिन्ह निर्माण करतात. कंपनीच्या ग्राहकांचे म्हणणे आहे की, जेव्हा ते त्यांची स्कूटर ओलाच्या सर्व्हिस सेंटरमध्ये सर्व्हिसिंगसाठी पाठवतात तेव्हा ती दुरुस्त होण्यासाठी 30 ते 45 दिवस लागतात. ग्राहकांच्या तक्रारींचे समाधान न झाल्याने निराशा वाढत असल्याची माहिती समोर येत आहे.
दिल्लीतील नजफगढ रोड येथे असलेल्या एका सेवा केंद्राला 10 कर्मचाऱ्यांची गरज आहे, मात्र केवळ 4 कर्मचारी कार्यरत आहेत. वाहने अनेक महिने साठवणुकीत ठेवल्याने ही घट झाली आहे. या सेवेच्या अभावामुळे अलीकडेच एका ग्राहकाने कर्नाटकातील कलबुर्गी येथे ओलाच्या शोरूमला आग लावली. वारंवार विनंती करूनही त्यांच्या सेवेत सुधारणा होत नसल्याने त्यांनी हे पाऊल उचलल्याचा दावा ग्राहकाने केला आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी शोरूमचे साडेआठ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
ओलाने भारतात लॉन्च झाल्यापासून 6,80,000 इलेक्ट्रिक स्कूटर विकल्या आहेत आणि त्यांच्या एस 1 मालिका एस 1 प्रो, एस1 एअर आणि एस1 एक्स या तीन मॉडेलमध्ये उपलब्ध आहेत. ग्राहकांच्या तक्रारी गांभीर्याने घेत कंपनीने एक विशेष टीम तयार केली असून काही कर्मचाऱ्यांची सेवा विभागात बदली केली आहे.
गेल्या जुलैमध्ये 41,724 स्कूटर विकल्या गेल्या होत्या, परंतु ऑगस्टमध्ये ही संख्या 27,517 युनिट्सवर घसरली. ओलाचा बाजारातील हिस्सा 39 वरून 31 टक्क्यांपर्यंत घसरला आहे तर बजाज आणि टीव्हीएससारख्या प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या स्कूटर्सना सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.