पाकिस्तानी सैन्यावरील हल्ल्यात 6 जवान ठार
खैबर पख्तूनख्वामधील घटना : अन्य 11 जखमी
वृत्तसंस्था/ पेशावर
अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातील एका सुरक्षा चौकीवर दहशतवाद्यांनी गुऊवारी-शुक्रवारी मध्यरात्री हल्ला केला. या हल्ल्यात सहा सुरक्षा जवान ठार झाले असून अन्य 11 जण जखमी झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानने (टीटीपी) हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी मोहीम राबविण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दहशतवाद्यांच्या एका गटाने दक्षिण वझिरिस्तान जिल्ह्यातील लाढा तहसीलमधील मिश्ता गावात एका चेक पोस्टवर हल्ला केल्याचे सांगण्यात आले. या हल्ल्यापूर्वी शुक्रवारी दक्षिण वझिरीस्तान जिह्यातील आझम वारसाक भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. या संघर्षात सात दहशतवादी ठार झाले तर दोन सुरक्षा कर्मचारी जखमी झाले आहेत.
22 ऑगस्टच्या घटनेत 11 जवान ठार
यापूर्वी 22 ऑगस्ट रोजी पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात दहशतवाद्यांनी पोलिसांवर रॉकेटने हल्ला केला होता. यामध्ये किमान 11 जवान ठार झाले होते. लाहोरपासून 400 किलोमीटर अंतरावर असलेल्या रहीम यार खान जिल्ह्यात अनेक पोलिसांना ओलीस ठेवण्यात आले होते. दहशतवाद्यांनी सुरक्षा ताफ्यावर रॉकेटने हल्ला केल्याचे पंजाब पोलिसांच्या प्रवक्त्याने सांगितले. तसेच 9 जून रोजी झालेल्या अशाचप्रकारच्या हल्ल्यात 7 जवान ठार झाले होते.