For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

काँग्रेसच्या 6 बंडखोरांना भाजपकडून उमेदवारी

06:13 AM Mar 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
काँग्रेसच्या 6 बंडखोरांना भाजपकडून उमेदवारी
Advertisement

हिमाचलमध्ये विधानसभा पोटनिवडणूक : गुजरात, कर्नाटकचे उमेदवारही जाहीर

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

हिमाचल प्रदेशच्या विधानसभा पोटनिवडणुकांसाठी भाजपने उमेदवारांची यादी जारी केली आहे. भाजपने काँग्रेसच्या 6 बंडखोरांना निवडणुकीच्या मैदानात उतरविले आहे. काही दिवसांपूर्वी या 6 आमदारांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता भाजपने याच 6 जणांना उमेदवारी दिली आहे.

Advertisement

भाजपने धर्मशाळा येथे सुधीर शर्मा, लाहौल-स्पीतिमधून रवि ठाकूर, सुजानपूरमधून राजिंदर राणा, बडसरमध्ये इंद्र दत्त लखनपाल, गगरेट येथे चैतन्य शर्मा आणि कुटलैह येथे देविंदर कुमार भुट्टो यांना उमेदवारी दिली आहे. या सर्व आमदारांनी राज्यसभा निवडणुकीत भाजप उमेदवार हर्ष महाजन यांना मतदान केले होते. यानंतर या आमदारांच्या विरोधात काँग्रेसने कारवाईची मागणी केल्याने विधानसभा अध्यक्षांनी त्यांना अपात्र घोषित केले होते.

हिमाचल प्रदेशात 27 फेब्रुवारी रोजी राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान झाले होते. काँग्रेसने अभिषेक मनु सिंघवी यांना तर भाजपने हर्ष महाजन यांना उमेदवारी दिली होती. काँग्रेसकडे 40 आमदार होते, तर मुख्यमंत्री सुक्खू यांनी 43 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला होता. तर 25 आमदार असलेल्या भाजपने हर्ष महाजन यांना उमेदवारी दिली होती. महाजन यांना एकूण 34 मते मिळाली होती.

राज्यसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराच्या बाजूने मतदान करणाऱ्या तीन अपक्ष आमदारांनीही शुक्रवारी विधानसभा सचिवांकडे स्वत:चा राजीनामा सोपविला होता. या आमदारांमध्ये आशीष शर्मा (हमीरपूर), होशियार सिंह (देहरा) आणि के.एल. ठाकूर (नालागढ) सामील होते. तिघांनीही विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते जयराम ठाकूर यांची भेट घेतली होती. त्यानंतर या तिघांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

भाजपने गुजरात, हिमाचल प्रदेश, कर्नाटक आणि बंगालमधील आगामी पोटनिवडणुकांसाठी उमेदवारांची यादी जारी केली आहे. गुजरातमध्ये 5 विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक होणार आहे. तसेच कर्नाटकात एक तर बंगालमध्ये दोन जागांकरता पोटनिवडणूक होईल.

पोरबंदरमध्ये मोढवाडियांना उमेदवारी

भाजपने गुजरातमधील 5 विधानसभा मतदारसंघांमधील पोटनिवडणुकीसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. राज्यातील दिग्गज नेते अर्जुन मोढवाडिया हे पोरबंदर मतदारसंघात भाजपचे उमेदवार असणार आहेत. काँग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आमदारांनाच उमेदवारी दिली आहे. वडोदराच्या वाघोडिया मतदारसंघात धमेंद्र सिंह वाघेला यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. भाजपच्या 5 उमेदवारांमध्ये काँग्रेसचे 4 माजी आमदार आहेत.

भगवानगोलामध्ये भास्कर सरकार

पश्चिम बंगालमध्ये दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक होईल. बारानगर मतदारसंघात सजल घोष तर मुर्शिदाबादच्या भगवानगोला येथे भास्कर सरकार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बारानगरचे तृणमूल आमदार तापस रॉय यांनी राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला होत. तापस रॉय हे कोलकाता उत्तर लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार आहेत. तर भगवानगोलाचे तृणमूल आमदार इदरीश अली यांचे निधन झाल्याने ही पोटनिवडणूक होत आहे.

सिक्कीममधील उमेदवारही घोषित

भाजपने ग्यालशिंग-बरन्याक मतदारसंघात भीम कुमार शर्मा तर नामची सिंघीथान येथे अरुणा मंगेर यांना विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे. मेली येथे योगेन राय यांना भाजपने संधी दिली आहे. फुरबा रिनजिंग शेरपा, पेम्पो शेरिंग लेप्चा, चेवांग दादुल भूटिया, निरेश भंडारी यांनाही भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे.

Advertisement
Tags :

.