Vashi Fraud Case | वाशीतील तरुणांची नोकरीचे आमिष दाखवून ६ जणांची १५ लाखांची फसवणूक
वाशीतील तरुणांची सरकारी नोकरीचा फसवणूक प्रकरण समोर
वाशी -सरकारी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून व त्यांना विश्वासात घेऊन सहा तरुणांची पंधरा लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याचा गुन्हा वाशी पोलिसांत नोंद झाला आहे. पोलीस यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीनुसार, वाशी येथील रहिवासी रईसोदिन (नबाब) हमीद काझी, संदीप चंद्रकांत चांदीएकर (रा. मुंबई), सनी (रा. मुंबई, पूर्ण नाव नाही), स्वप्नील मोरे (रा. मुंबई) या चार आरोपींविरुद्ध बाशी येथील बाळासाहेब पंडित सुकाळे (वय ५६) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्यासह इतर पाच जणांची फसवणूक झाल्याचे त्यांनी नमूद केले आहे. १७ मे २०२४ ते ६ जानेवारी २०२५ या कालावधीत सुशिक्षित मुलांना शासकीय नोकरी लावतो म्हणून फसवणूक केली आहे.
मुलांना सरकारी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून त्यांना विश्वासात घेऊन फिर्यादी व साक्षीदार यांच्याकडून सहा मुलांचे १५ लाख रुपये आरोपी क्रमांक एक यांच्याकडे काही रक्कम रोख स्वरूपात व काही रक्कम आरोपी क्रमांक दोन यांचे फोन पे नंबरवर तसेच उर्वरित श्री स्वामी समर्थ या बँक खात्यावर घेऊन मुलांना खोटे नोकरीचे जॉईनिंग लेटर देऊन मुलांच तसेच फिर्यादी व साक्षीदार यांचा विश्वासघात केला. फिर्यादी व साक्षीदार यांनी पैसे देण्याचे मागणी केली असता ३ लाख १५ हजार रुपये परत केले. उर्वरित ११ लाख ८५ हजार रुपये परत देण्याची मागणी केली असता आरोपींनी फिर्यादी व साक्षीदार यांना धमकावून पैसे देण्यास टाळाटाळ करून फसवणूक केली.
फिर्यादीच्या मजकुरावरून पोलीस निरीक्षक शंकर शिंदे यांच्या आदेशाने दखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक अजयसिंह भाळे करीत आहेत.