For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कार-दुचाकी अपघातात 6 ठार

11:18 AM Feb 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
कार दुचाकी अपघातात 6 ठार
Advertisement

भरधाव कारची दोन दुचाकींना धडक : रायबाग तालुक्यातील मुगळखोड येथील दुर्घटना

Advertisement

वार्ताहर /कुडची

भरधाव कारने दोन दुचाकींना धडक दिल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार झाडावर आदळून झालेल्या विचित्र अपघातात सहा जण ठार झाल्याची दुर्घटना शुक्रवारी सायंकाळी रायबाग तालुक्यातील मुगळखोड येथे घडली. यामध्ये अन्य एकजण जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या भीषण अपघातात कारमधील चौघांसह दुचाकींवरील दोघांना प्राण गमवावे लागले. दुचाकीवरील एकजण   शिक्षक होता. भरधाव कारच्या दर्शनी भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला होता. मल्लिकार्जुन रामाप्पा मेरठे (वय 16), आकाश रामाप्पा मेरठे (वय 14), लक्ष्मी रामाप्पा मेरठे (वय 19) तिघेही राहणार गुर्लापूर ता. मुडलगी व चालक एकनाथ भीमाप्पा पडतारे (वय 22) रा. कंकणवाडी ता. रायबाग अशी कारमधील ठार झालेल्यांची नावे आहेत. एका दुचाकीवरील हणमंत मल्लाप्पा मल्यागोळ (42) रा. दुरदुंडी तालुका मुडलगी हे शिक्षक ठार झाले

Advertisement

तर त्यांच्या दुचाकीवरील आणखी एक शिक्षक बाळानंद परसाप्पा माळगी (37) गोकाक हे जखमी झाले आहेत. तर दुसऱ्या दुचाकीवरील नागाप्पा लक्ष्मण यादवन्नावर (वय 48) रा. मुगळखोड हा ठार झाले. या भीषण घटनेची नोंद हारूगेरी पोलीस स्थानकात झाली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी, जत-जांबोटी रस्त्यावर मुगळखोडजवळ कालव्याजवळ भरधाव कारने दोन दुचाकींना धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. या रस्त्यावर भरधाव मोटार येत होती. यावेळी एका दुचाकीवरून दोघेजण गोकाककडे तर दुसऱ्या दुचाकीवरून एकजण तेरदाळहून मुगळखोडकडे येत होता. यावेळी गुर्लापूरहून मुगळखोडकडे जाणाऱ्या भरधाव कारने एका दुचाकीस्वाराला पाठीमागून व एका दुचाकीस्वाराला समोरून जोराने धडक दिली. यामध्ये दोन दुचाकींवरील तिघेही फरफटत रस्त्यावर आदळले. यानंतर भरधाव मोटार थेट रस्त्याकडेला असलेल्या मोठ्या झाडावर जाऊन आदळली.

दुचाकीवरील दोघे जागीच ठार

दोन दुचाकींवरील दोघे जागीच ठार झाले तर तिसरा गंभीर जखमी आहे. एका दुचाकीवरून मुगळखोडकडे येणारे यादवन्नावर हे जागीच ठार झाले. त्यांची दुचाकी बाजाराच्या पिशव्यांसह रस्त्यावर पडली होती. तर त्यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. दुसऱ्या दुचाकीवरून दोघेजण हारूगेरीहून गोकाककडे जात होते. त्यांनाही धडक बसल्याने त्यातील मल्यागोळ हे जागीच ठार झाले तर सहकारी माळगी हे गंभीर जखमी झाले आहेत. मल्यागोळ यांचाही मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत घटनास्थळी पडला होता. माळगी यांना गोकाक येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.

कारमधील चौघांचाही मृत्यू

मोटार झाडावर आदळल्याने मोटारीतील मेरठे कुटुंबातील तिघे व चालक पडतारी हे चौघेही ठार झाले आहेत. मेरठे हे कुटुंब कशासाठी व कुठे जात होते, याची माहिती पोलिसांना मिळायची होती. पण, नावावरून एकाच कुटुंबातील तिघे असल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनास्थळी अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक आर. बी. बसरगी, अथणीचे पोलीस उपअधीक्षक श्रीपाद जलदे, हारूगेरी पोलीस ठाण्याचे मंडल पोलीस निरीक्षक रवीचंद्रन एफ., अथणीचे मंडल पोलीस निरीक्षक रवींद्र नाईकवाडी, हारूगेरीचे उपनिरीक्षक गिरिमल उप्पार व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. हारूगेरी सरकारी दवाखान्यात शवचिकित्सा करून मृतदेह रात्री नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

कारचा चक्काचूर

भरधाव कार दोन दुचाकीवाल्यांना चिरडून झाडावर आदळल्याने वाहनाचा चक्काचूर झाला होता. ही कार नेमकी कोणती होती हेही घटनास्थळी समजण्यासारखी स्थिती नव्हती. त्यामुळे कार भरधाव वेगाने जाऊन झाडावर आदळल्याचे घटनास्थळी स्पष्टपणे दिसत होते. कार जोराने आदळल्याने मोटारीतील मृतदेह चिरडून आतमध्ये अडकले होते. पोलीस व स्थानिकांनी प्रयत्न करून कारमधील मृतदेह बाहेर काढले.

मृतदेह व वाहने विखुरलेली

शुक्रवारी संध्याकाळी हा अपघात झाल्यानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली. नेमके कशाचा अपघात झाला याची माहिती प्रत्यक्ष पाहूनही येत नव्हती. मोटार झाडावर जाऊन चक्काचूर झालेली व दोन दुचाकी इतरत्र पडलेल्या होत्या. दुचाकीवरील मृतदेह रस्त्यावर रक्ताच्या थरोळ्यात पडले होते. तर कारमधील मृतदेह बाहेर काढण्यास मोठे प्रयत्न करावे लागले. रस्ता दुपदरी असल्याने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

शिक्षकाच्या मृत्यूने हळहळ

एका दुचाकीवरून दोघे शिक्षक रोज हारूगेरीहून गोकाकडे ये-जा करत होते. या अपघातात कारने त्यांच्याही दुचाकीला धडक दिल्याने त्यातील हनमंत मल्लाप्पा मल्यागोळ हे ठार झाले तर सहकारी शिक्षक बाळानंद परसाप्पा माळगी हे जखमी आहेत. हनमंत यांना उपचारासाठी नेताना मृत्यू झाला आहे. तर बाळानंद यांच्यावर गोकाकमध्ये उपचार सुरू आहेत. प्रत्येक शनिवारी सकाळची शाळा असल्याने हे दोघे शिक्षक शुक्रवारी शाळेमध्ये वसती राहत होते. पण, यावेळी शुक्रवारी त्यांनी गावाकडे जाण्याचा बेत आखला आणि त्यांना मोटारीने काळ बनून जीव हिरावून घेतला. या दुर्घटनेत शिक्षकांना फटका बसल्यामुळे त्यांच्या अनेक सहकाऱ्यांसह परिचितांनी घटनास्थळी व नंतर दवाखान्यासमोर गर्दी केली होती.

Advertisement
Tags :

.