प्रवासी बस उलटल्याने झारखंडमध्ये सहा ठार
हजारीबागमधील अपघातात 12 जखमी
वृत्तसंस्था/हजारीबाग
कोलकाताहून पाटण्याला जाणारी प्रवाशांनी भरलेली बस हजारीबागमध्ये गुऊवारी सकाळी उलटली. या अपघातात सहा प्रवाशांचा मृत्यू झाला. तर 12 जण जखमी झाले आहेत. यातील पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर एका प्रवाशाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुर्घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना तातडीने ऊग्णालयात पाठवण्यात आले. डॉक्टरांचे पथक ऊग्णांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. पश्चिम बंगालमधून बिहारला जाणारी प्रवासी बस गुऊवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास जिह्यातील बरकाथा ब्लॉकमधील गोर्हर पोलीस स्टेशन परिसरात उलटली.
या दुर्घटनेतील जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जखमींना चांगल्या उपचारांसाठी रांचीमधील सरकारी इस्पितळात पाठवण्यात आले आहे. तर काही जखमींवर हजारीबाग मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच माजी आमदार जानकी यादव यांच्यासह त्यांचे समर्थक-कार्यकर्त्यांनी घटनास्थळी पोहोचत बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुटका करून प्राथमिक उपचाराची व्यवस्था केली. हजारीबागच्या डीसींनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. जखमींवर योग्य उपचार करणे ही पहिली प्राथमिकता असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मृतांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे.