6 आयपीओंचे होणार या आठवड्यात सादरीकरण
इंडिया शेल्टर, एसजे लॉजिस्टीक्स यांचा समावेश : आतापर्यंत 41 हजार कोटींची उभारणी
वृत्तसंस्था/ मुंबई
यंदा जवळपास 41 हजार कोटी रुपयांची उभारणी आयपीओच्या माध्यमातून करण्यात आली आहे. जागतिक पटलावर एकंदरच पाहता भारतामध्ये 2023 मध्ये आयपीओंची वाढती संख्या लक्षणीय अशीच राहिली आहे. आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीमध्ये एकंदर 21 आयपीओंचे सादरीकरण करण्यात आले आहे. या आधीच्या वर्षी समान अवधीत पाहता फक्त चारच आयपीओ सादर करण्यात आले होते. या आठवड्यात 6 आयपीओ सादर केले जाणार असून त्यांच्यामार्फत 2500 कोटी रुपयांची उभारणी केली जाणार आहे.
इंडिया शेल्टर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड
या आठवड्यामध्ये इंडिया शेल्टर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड यांचा आयपीओ 13 डिसेंबरला गुंतवणूकीसाठी खुला होणार असून 15 डिसेंबरला तो बंद होणार आहे. आयपीओच्या माध्यमातून 1200 कोटी रुपयांची उभारणी करण्याचा मानस कंपनीचा आहे. आयपीओकरता समभागाची किंमत 469 ते 493 रुपये प्रति समभाग अशी ठेवण्यात आली आहे. 30 समभागांचा एक लॉट खरेदी करता येणार असल्याचेही कंपनीने म्हटले आहे.
डीओएमएस उभारणार 1200 कोटी
यांच्यापाठोपाठ डीओएमएस यांचा आयपीओदेखील 13 डिसेंबरला बाजारात सादर होणार आहे. 15 डिसेंबरपर्यंत यामध्ये गुंतवणूक करण्याची संधी गुंतवणूकदारांना असणार आहे. बाराशे कोटी रुपयांच्या उभारणीची तयारी कंपनीने केली असून 350 कोटी रुपयांचे ताजे समभाग बाजारात सादर केले जाणार आहेत. आयपीओसाठी कंपनीने 750 ते 790 रुपये प्रति समभाग अशी किंमत निश्चित केली आहे. या अंतर्गत 18 समभागांचा एक लॉट गुंतवणूकदारांना खरेदी करता येणार आहे.
एसजे लॉजिस्टिक्स
एसजे लॉजिस्टिक्स यांचा आयपीओ 12 डिसेंबरला बाजारात खुला होणार असून 14 डिसेंबरला तो बंद होणार आहे. या तीन दिवसांमध्ये गुंतवणूकदारांना बोली लावता येणार आहे. 48 कोटी रुपयांची उभारणी या आयपीओच्या माध्यमातून करण्यात येणार असून आयपीओची किंमत 121 ते 125 रुपये प्रति समभाग अशी निश्चित करण्यात आली आहे. किमान 1 हजार समभाग लॉटअंतर्गत खरेदी करावे लागणार आहेत.
प्रेसटॉनिक इंजिनियरिंग लिमिटेड
प्रेसटॉनिक इंजिनियरिंग लिमिटेड यांचा आयपीओसुद्धा या आठवड्यामध्ये दाखल होणार आहे. 11 डिसेंबरला खुला झालेला हा आयपीओ 13 डिसेंबरला बंद होणार आह. 32 लाख ताजे समभाग सादर केले जाणार आहेत. 72 रुपये प्रति समभाग अशी आयपीओची किंमत निश्चित करण्यात आली आहे. एका लॉटअंतर्गत 1600 समभाग गुंतवणूकदारांना खरेदी करता येणार आहेत.
श्री ओएफएसएम ई-मोबिलिटी लिमिटेड
श्री ओएफएसएम ई-मोबिलिटी लिमिटेड यांचा आयपीओ 14 डिसेंबरला खुला होणार असून 18 तारखेला बंद होणार आहे. 24 कोटी रुपये या आयपीओतून उभारले जाणार आहे. 65 रुपये प्रति समभाग अशी समभागाची किंमत निश्चित करण्यात आली आहे. याप्रमाणे 2000 समभागांचा एक लॉट गुंतवणूकदारांना खरेदीची संधी असणार आहे.
यासोबतच सियाराम रिसायकलिंग यांचा आयपीओदेखील 14 डिसेंबरला खुला होणार असून 18 डिसेंबरला तो बंद होणार आहे. 49 कोटी रुपये उभारण्याची कंपनीची योजना असून आयपीओची किंमत 43-46 रुपये प्रतिसमभाग याप्रमाणे निश्चित करण्यात आली आहे. 3000 समभागांचा एक लॉट गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध होणार आहे.