धूत ट्रान्समिशनसह 6 आयपीओंना मिळाली सेबीची मंजुरी
वृत्तसंस्था, मुंबई
क्वीक कॉमर्स कंपनी झेप्टोसह धूत ट्रान्समिशन व इतर चार कंपन्यांच्या आयपीओला शेअर बाजारातील नियामक संस्था सेबी यांनी मंजुरी दिली आहे. सदरच्या कंपन्या आपल्या आयपीओच्या सादरीकरण प्रक्रियेला आता जोर देताना दिसतील. परिस्थितीनुसार आयपीओ लाँच करण्याचा कार्यक्रम कंपन्यांकडून जाहीर केला जाईल.
धूत ट्रान्समिशनने फेब्रुवारी महिन्यात आयपीओकरता सेबीकडे अर्ज सादर केला होता. डिसेंबरमध्ये झेप्टोने आपला अर्ज सादर केला होता. बाजारातील नियामक सेबीने सहा कंपन्यांना आयपीओअंतर्गत निधी उभारण्यासाठी मंजुरी दिली आहे. यामध्ये क्विक कॉमर्स युनिकॉर्न कंपनी झेप्टो आणि ऑटो पार्टस निर्मिती कंपनी धूत ट्रान्समिशन यांच्यासह होरायझन इंडस्ट्रियल पार्क्स, सर्जीवियर, क्रिस्टल क्रॉप प्रोटेक्शन आणि हॉटेल पोलो टॉवर्स या कंपन्यांचा समावेश आहे.
धूत ट्रान्समिशनचा आयपीओ
सदरच्या कंपन्यांनी ऑक्टोबर ते फेब्रुवारी या दरम्यान आयपीओकरिता आपले अर्ज सादर केले होते. 4 ते 8 मे दरम्यान सेबीने आयपीओला मंजुरी दिली आहे. 6 कंपन्यांचे समभाग बीएसई आणि एनएसईवरती सूचीबद्ध होतील. झेप्टो आयपीओअंतर्गत 11 हजार कोटी रुपयांची उभारणी करणार असल्याचे सादरीकरणात म्हटले आहे तर धूत ट्रान्समिशन आपल्या आयपीओच्या माध्यमातून 2258 कोटी रुपये उभारण्याचे नियोजन करत आहे. सदरच्या आयपीओअंतर्गत नव्या इक्विटी समभागांच्या सादरीकरणासोबतच सध्याच्या गुंतवणूकदारांकडून ऑफर फॉर सेल सारखी योजनाही जारी असणार असल्याचे म्हटले जात आहे. परंतु प्रवर्तक मात्र ऑफर फॉर सेल अंतर्गत आपली हिस्सेदारी विकणार नसल्याचे सांगितले जात आहे. धूत ट्रान्समिशनमध्ये दिग्गज खासगी इक्विटी फर्म बॅन कॅपिटल यांची गुंतवणूक आहे.
होरायझन, सर्जीवेअरचे आयपीओ
याच दरम्यान होरायझन इंडस्ट्रियल पार्क्स यांचाही आयपीओ येणार असून ते 2600 कोटी रुपये उभारण्याची योजना बनवत आहेत. या आयपीओ अंतर्गत केवळ नवे इक्विटी समभाग जारी करण्याची होरायझनची योजना आहे. ऑफर फॉर सेल अंतर्गत समभाग विक्री केले जाणार नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. सदरच्या आयपीओतून उभारण्यात आलेली रक्कम ही जुने कर्ज फेडण्यासाठी वापरली जाईल असे म्हटले जात आहे. उत्तर प्रदेशमधील सर्जीवेअर ही कंपनी आयपीओच्या माध्यमातून 370 कोटी रुपयांची उभारणी करणार आहे आणि यातून नवे समभाग जारी करणार आहे. प्रवर्तक घनश्यामदास अग्रवाल यांच्याकडून 370 कोटी रुपयांची ऑफर फॉर सेल योजना असेल. आयपीओतून उभारलेली रक्कम मशीन खरेदी, कर्जाची परतफेड आणि कंपनीच्या इतर कामकाजांसाठी खर्च केली जाणार आहे.
क्रिस्टल क्रॉप, हॉटेल पोलोचे आयपीओ
पिकांच्या संदर्भात काम करणारी क्रिस्टल क्रॉप प्रोटेक्शन यांचा आयपीओ 600 कोटी रुपये उभारणीचा असणार आहे. या आयपीओत नवे इक्विटी समभाग सादर केले जाणार आहेत. याशिवाय प्रवर्तक आणि गुंतवणूकदारांकडून 74,05,387 समभाग ऑफर फॉर सेल अंतर्गत सादर केले जातील. सदरच्या आयपीओतून उभारलेल्या रकमेचा वापर कंपनी सहकारी कंपनी वरील असणारे कर्ज फेडण्यासाठी करणार आहे. शिवाय नवे अधिग्रहण, रणनीती बदलांसाठी, विकासासाठी पैसे गुंतवणूक करण्याची योजना कंपनीची आहे.
याचदरम्यान हॉटेल पोलो टॉवर्स यांचा आयपीओ सादर होणार असून 300 कोटी रुपये उभारण्याची तयारी कंपनीने केली आहे. आयपीओअंतर्गत नवे इक्विटी समभाग सादर केले जातील. तसेच प्रवर्तकांकडून 71.2 लाख समभाग ऑफर फॉर सेल अंतर्गत सादर केले जातील. पूर्वोत्तर आणि उत्तर भारतामध्ये पोलो आणि मॅक्स ब्रँड अंतर्गत हॉटेल आणि रिसॉर्टची साखळी कंपनी चालवते.