चौथ्या टप्प्यातील 6 महत्त्वाचे चेहरे
यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा चौथा टप्पा आज सोमवारी होत आहे. या टप्प्यात अनेक महत्वाच्या नेत्यांच्या भाग्याचा निर्णय होणार आहे. या नेत्यांपैकी 6 जण अतिमहत्वाचे असून त्यांच्या कामगिरीवर त्यांच्या पक्षांचेही भवितव्य अवलंबून राहणार असल्याने त्यांच्या मतदारसंघांकडे राजकीय अभ्यासकांसह सर्वसामान्यांचेही लक्ष आहे. या नेत्यांमध्ये सत्ताधारी नेत्यांसह विरोधी पक्षनेत्यांचाही समावेश असून या नेत्यांचा केवळ त्यांच्याच नाही, तर आसपासच्या मतदारसंघांवरही प्रभाव पडतो, असे दिसून येते...
नेते आणि राजकीय कामगिरी
- अखिलेश यादव
हे उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाचे प्रमुख असून ते 2012 ते 2017 या काळात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीही राहिले आहेत. ते याच राज्याच्या कन्नौज मतदारसंघातून उमेदवार असून आतापर्यंत तीन वेळा येथूनच लोकसभेवर निवडले गेलेले आहेत. त्यांच्या पत्नी डिंपल यादव या याच मतदारसंघातून एकदा तर त्यांचे दिवंगत पिता मुलायमसिंग यादव यांनाही या मतदारसंघाने लोकसभेवर पाठविले आहे. हा मतदारसंघ यादव घराण्याचा बालेकिल्ला यामुळेच मानला जातो.
तथापि, या मतदारसंघातून 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे सुब्रत पाठक यांनी डिंपल यादव यांच्या विरोधात विजय मिळवून या बालेकिल्ल्याला खिंडार पाडले होते. त्यामुळे यंदा अखिलेश यादव यांनी स्वत:च येथून स्पर्धेत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या पत्नी डिंपल मैनपुरी मतदारसंघातून लढत आहेत. भारतीय जनता पक्षाने सुब्रत पाठक यांनाच पुन्हा उमेदवारी दिली आहे. ही निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे.
2022 मध्ये झालेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत या लोकसभा मतदारसंघातील सहा पैकी पाच जागा भारतीय जनता पक्षाने जिंकल्या होत्या. केवळ एक जागा समाजवादी पक्षाला मिळाली होती. परिणामी, येथे समाजवादी पक्षासाठी स्पर्धा सोपी नाही. भारतीय जनता पक्षानेही सुब्रत पाठक यांच्या पाठीशी आपले सर्व सामर्थ्य उभे केल्याने यादव यांनाही प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे, हे निश्चित आहे. हा मतदारसंघ लक्ष ठेवण्यासारखा आहे.
- गिरीराज सिंग
बिहारमधील भारतीय जनता पक्षाचे महत्वाचे नेते म्हणून गिरीराज सिंग यांचा परिचय आहे. ते केंद्रात मंत्री असून बेगुसराय मतदारसंघातून उमेदवार आहेत. त्यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कन्हय्या कुमार यांचा प्रचंड मताधिक्क्याने पराभव केला होता. आता कन्हय्या कुमार हे काँग्रेसवासी झालेले आहेत. मात्र, त्यांना या मतदारसंघात काँग्रेसकडून उमेदवारी मिळालेली नाही. सीपीआयने अवधेश कुमार राय यांना यावेळी उतरविले आहे.
2004 पूर्वी हा मतदारसंघ काँग्रेसचा गढ मानला जात होता. काँग्रेसने येथे 9 वेळा निवडणूक जिंकली आहे. मात्र, 2014 मध्ये येथून भारतीय जनता पक्षाचे भोला सिंग हे जवळपास पावणेदोन लाख मतांनी निवडून आले आहेत. 2019 मध्ये हा मतदारसंघ गिरीराज सिंग यांना मिळाला. ते केंद्रातील लोकप्रिय मंत्री म्हणून गणले जातात. त्यांच्यासाठी हा मतदारसंघ याही निवडणुकीत सोपा असल्याची चर्चा आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी अवधेश राय काहीसे नवखे आहेत.
या मतदारसंघात साधारणत: 20 लाख मतदार असून रजपूत, यादव, दलित, मुस्लीम, ब्राम्हण आणि भूमिहार हे समाजघटक प्रामुख्याने आहेत. रजपूत मतदार निर्णायक ठरतात असा अनुभव आहे. गेल्या 25 वर्षांमध्ये येथे डाव्या आघाडीने आपले बस्तान बसविण्याचा प्रयत्न केला आहे. तथापि, अद्याप या आघाडीला म्हणावा तसा प्रभाव निर्माण करता आलेला नाही. तरीही, डाव्यांच्या प्रभावाची काही क्षेत्रे येथे आहेत. त्यामुळे विरोधी आघाडीत ती डाव्यांना मिळाली.
- अधीर रंजन चौधरी
पश्चिम बंगालच्या बहरामपूर मतदारसंघातून हे काँग्रेसच्या उमेदवारीवर मैदानात आहेत. ते सध्या लोकसभेतील काँग्रेसचे प्रमुख नेतेही आहेत. अनेकदा त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे प्रसिद्धीच्या झोतात असतात. हा मतदारसंघ एकेकाळी क्रांतीकारी समाजवादी पक्षाचा गढ होता. तथापि, गेल्या पाच लोकसभा निवडणुकांमध्ये सातत्याने अधीर रंजन चौधरी हे येथून निवडून येत आहेत. यंदा त्यांना निवडणूक सोपी नसल्याचे बोलले जात आहे. या मतदारसंघात यंदा काँग्रेस-डावे युती, तृणमूल काँग्रेस आणि भाजप असा तिहेरी संघर्ष आहे.
1996 मध्ये नबग्राम विधानसभा मतदारसंघात चौधरी विजयी झाल्यानंतर त्यांना 1999 मध्ये लोकसभेला काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली. तेव्हापासून त्यांनी या मतदारसंघावर प्रभाव पाडला आहे. तृणमूल काँग्रेसने येथे क्रिकेटपटू युसुफ पठाण याला उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात मुस्लीम मतदारांची संख्या 30 टक्के आहे. हे मतदार तृणमूलकडे वळल्यास चौधरी अडचणीत येऊ शकतात. त्यामुळे यावेळी येथील संघर्ष चुरशीचा होईल असे बोलले जात आहे.
काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस हे दोन्ही पक्ष विरोधी आघाडीत असूनही पश्चिम बंगालमध्ये त्यांची युती नाही. विरोधी आघाडी या राज्यात नाही, असे ममता यांनी आधीच स्पष्ट केल्याने चौधरी यांची कोंडी झाली आहे. त्यामुळे त्यांनी ‘मला मत द्यायचे नसेल, तर भाजपला द्या, असे आवाहन केल्याने बॅनर्जी यांनी त्यांचा उल्लेख भाजपचे दलाल असा केला होता. येथे बॅनर्जी यांनी स्वत: प्रचार केल्याने वितुष्ट उघड झाले आहे.
- शत्रुघ्न सिन्हा
शत्रुघ्न सिन्हा हे माजी चित्रपट अभिनेते आहेत. जवळपास 25 वर्षे ते भारतीय जनता पक्षात होते. बिहारच्या पाटणा शहर मतदारसंघातून ते या पक्षाचे खासदारही राहिले आहेत. तथापि, 2019 मध्ये मतभेद झाल्याने त्यांनी भारतीय जनता पक्ष सोडून तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या पक्षाने त्यांना पश्चिम बंगालमधील आसनसोल मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. त्यांनी या मतदारसंघात पोटनिवडणुकीत दोन वर्षांपूर्वी विजय मिळविलेला आहे.
सुप्रसिद्ध बंगाली गायक बाबुल सुप्रियो यांनी या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारीवर दोन वेळा विजय मिळविला होता. परंतु त्यांनी 2021 मध्ये पक्ष सोडून तृणमूलमध्ये प्रवेश केला. त्यांनी लोकसभेचाही त्याग केला होता. त्यानंतर ही जागा शत्रुघ्न सिन्हा यांना मिळाली होती. यावेळीही त्यांना उमेदवारी देण्यात आली असून त्यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाने एस. एस. अहलुवालिया यांना उमेदवारी दिली आहे. सीपीआयएमच्याही उमेदवार आहेत.
हा हिंदूबहुल मतदारसंघ आहे. मुस्लीमांची मते 15 टक्क्यांच्या आसपास आहेत. सीपीआयएमने मुस्लीम उमेदवार दिल्याने आणखी चुरस निर्माण झाली आहे. शत्रुघ्न सिन्हा आणि एस. एस. अहलुवालिया यांच्यापैकी कोणाचे पारडे जड आहे, या संबंधात विश्लेषकांमध्ये मतमतांतरे आहेत. येथे आमदारांची संख्या सात असून त्यांच्यापैकी तृणमूल काँग्रेसचे पाच तर भारतीय जनता पक्षाचे 2 आमदार आहेत. पण लोकसभेच्या निवडणुकीत मतदान पॅटर्न वेगळा असतो.
- अर्जुन मुंडा
अर्जुन मुंडा हे भारतीय जनता पक्षाच्या वनवासी समाजातील नेत्यांपैकी प्रसिद्ध नेते आहेत. त्यांना झारखंड राज्यातल्या खुंटी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत ते याच मतदारसंघातून निसटत्या मताधिक्क्याने विजयी झाले होते. हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाचा गढ मानला जातो. 1989 पासून येथे केवळ एकदा या पक्षाचा पराभव झाला आहे. कारिया मुंडा हे नेते येथून सात वेळा लोकसभेवर निवडून आले आहेत.
मध्यंतरीच्या काळात अर्जुन मुंडा यांनी भारतीय जनता पक्ष सोडला होता. मात्र, 2019 नंतर ते पुन्हा भाजपात आले. ते झारखंडचे माजी मुख्यमंत्रीही आहेत. या मतदारसंघात वनवासी मतदारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे त्यांची मते निर्णायक ठरत असतात. काँग्रेसने येथे यंदा गेल्यावेळचे पराभूत उमेदवार कालिचरण मुंडा यांनाच उमेदवारी दिली आहे. गेल्यावेळी त्यांचा थोडक्या मतांनी पराभव झाल्याने यावेळी काँग्रेसनेही प्रचार जोरदार चालविला होता.
या मतदारसंघात विधानसभेच्या सहा जागा आहेत. त्यांच्यापैकी दोन झारखंड मुक्ती मोर्चाकडे, दोन काँग्रेसकडे तर दोन भारतीय जनता पक्षाकडे आहेत. यंदाही काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चा यांची युती आहे. त्यामुळे मुंडा यांना विजयासाठी मोठे परिश्रम करावे लागले आहेत. त्यांनी प्रचारात प्रारंभापासूनच आघाडी घेतली होती. तरीही येथे अत्यंत चुरशीची लढत होईल आणि निर्णय केवळ काही हजार मतांमधेच लागेल, अशी स्थिती असल्याचे दिसून येते.
- माधवी लता
एआयएमआयएम या मुस्लीम पक्षाचा गढ असलेल्या आणि तेलंगणाची राजधानी असलेल्या हैद्राबाद मतदारसंघात यावेळी भारतीय जनता पक्षाने तेलगु अभिनेत्री माधवी लता यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात एमआयएमचे असदुद्दिन ओवैसी आहेत. एकेकाळी काँग्रेसचा गढ असणारा हा मतदारसंघ 1989 पासून एमआयएमच्या ताब्यात आहे. ओवैसी यांचे वडील सलाउद्दिन ओवैसीही येथून खासदार होते. मुस्लीमांची संख्या येथे 70 टक्के असल्याचे बोलले जाते.
तथापि, या मतदारसंघात बनावट मतदारांची संख्याही मोठी असल्याचा आरोप केला जातो. यावेळी निवडणूक आयोगाने जवळपास 6 लाख बोगस नावे मतदारसूचीतून काढून टाकली आहेत, अशीही चर्चा आहे. मात्र, यासंबंधी अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. या मतदारसंघात 7 विधानसभा मतदारसंघ असून त्यांच्यापैकी केवळ 1 भारतीय जनता पक्षाकडे तर 6 एमआयएमकडे आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला येथे स्पर्धा कठीण आहे, असे बोलले जाते.
माधवी लता यांनी प्रचारात मात्र आघाडी घेतल्याचे दिसते. घरोघरी प्रचारावर त्यांचा भर आहे. या जागेवर भारतीय जनता पक्ष ‘तत्वाचा प्रश्न’ म्हणून संघर्ष करीत असतो. याहीवेळी माधवी लता या कितपत स्पर्धा करु शकतात, याकडे साऱ्यांचे लक्ष आहे. त्यांच्या लोकप्रियतेमुळे हा मतदारसंघ अधिक चर्चेत आला आहे. येथे काँग्रेसनेही मुस्लीम उमेदवार दिला असून भारत राष्ट्र समितीने ग•ाम श्रीनिवास यादव यांना उमेदवारी दिली आहे. येथे चौकोनी स्पर्धा दिसून येत आहे.