छत्तीसगड रेल्वे अपघातात 6 मृत्यूमुखी
प्रवासी गाडी मालगाडीवर आदळ्याने ही दुर्घटना
वृत्तसंस्था / रायपूर
छत्तीसगडमधील शहर बिलासपूर येथील रेल्वेस्थानानजीक झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. एकाच रेल्वेमार्गावर प्रवासी गाडी आणि मालगाडी आल्याने त्यांच्यात समोरासमोर टक्कर झाली. त्यामुळे हा अपघात झाला आहे. आपत्तीनिवारण कार्य त्वरित हाती घेण्यात आले असून डब्यांमध्ये अडकलेल्या काही प्रवाशांना वाचविण्यात आले आहे. आणखी काही प्रवासी डब्यांमध्ये अडकलेले असून त्यांना काढण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत, असे रेल्वेविभागाकडून प्रतिपादन करण्यात आले आहे.
प्रारंभिक महितीनुसार एक स्थानिक प्रवासी गाडी गेरवा रोड स्थानकावरुन बिलासपूर स्थानकाकडे येत होती. गाटोरा आणि बिलासपूर स्थानकांच्या मध्ये याच मार्गावरुन विरुद्ध दिशेला जाणाऱ्या मालगाडीची आणि या प्रवासी गाडीची समोरासमोर टक्कर झाली. त्यामुळे दोन्ही गाड्या रुळांवरुन घसरल्या. प्रवासी गाडीचे अनेक डबे उलटून पडल्याने अनेक प्रवासी जखमी झाले. आतपर्यंत सहा प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. अनेक प्रवासी जखमी असून त्यांच्यातील काही गंभीर जखमी आहेत. त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
बचावकार्याला त्वरित प्रारंभ
ही दुर्घटना घडल्यानंतर त्वरित राज्य सरकारची आणि रेल्वे विभागाची आपत्तीनिवारण दले घटनास्थळी पोहचविण्यात आली. त्यांनी त्वरित डब्यांमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यास प्रारंभ केला. अनेक प्रवासी तोपर्यंत अपघतग्रस्त डब्यांमधून बाहेर आलेले होते. त्यांच्यापैकी जखमी प्रवाशांना रुग्णालयांमध्ये नेण्यात आले. काही किरकोळ जखमी प्रवाशांना प्रथमोपचार करुन जाऊ देण्यात आले आहे. किमान 40 प्रवासी जखमी अवस्थेत आहेत.
घटनास्थळी हृदयद्रावक दृष्य
गाड्या समोरासमोर एकमेकींवर आदळल्याने प्रवासी गाडीचा पहिला डबा इंजिनावर चढल्याचे दिसून आले. घटनास्थळावरचे दृष्य अत्यंत हृदयद्रावक होते, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. अनेक जखमी आणि मृत प्रवाशांच्या शरीरांचे अवयव तेथे तुटून पडल्याचे दिसून आले. मात्र, त्वरित साहाय्यताकार्य हाती घेण्यात आल्याने जीवीतहानी कमी करण्यात यश आले, अशी माहितीही देण्यात आली.
वाहतूक अनेक तास बंद
या अपघातामुळे या मार्गावरील अनेक गाड्या अन्य मार्गांवर वळविण्यात आल्या. तसेच, काही प्रवासी गाड्या रद्द करण्यात आल्या. काही गाड्यांना विलंब झाला. या अपघातामुळे मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलडले असेही स्पष्ट करण्यात आले आहे. रात्री उशीरा हा रेल्वेमार्ग रेल्वेंसाठी मोकळा करण्यात आल्याचे दिसून आले.
कोणाची चूक...
हा अपघात मालगाडी चालकाचे सिग्नलकडे दुर्लक्ष झाल्याने झाला, असा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला आहे. तर काही जणांच्या म्हणण्यानुसार सिग्नलमनच्या चुकीमुळे दोन्ही गाड्या एकाच मार्गावर आल्या. गाड्या थांबविण्याचा प्रयत्न चालकांनी केला. तथापि, तो पर्यंत बराच वेळ झाला होता. त्यामुळे टक्कर टळू शकली नाही, अशीही माहिती मध्य रेल्वेच्या प्रवक्त्याने दिली आहे.
चौकशीचा आदेश
रेल्वे विभागाने या अपघाताच्या चौकशीचा आदेश दिला आहे. उत्तरदायित्व निश्चित करुन संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. मानवी चुकीमुळे हा अपघात झाला असल्याचे प्रथमिक निरीक्षण आहे. मात्र, चौकशीनंतरच या अपघाताच्या कारणांची निश्चित माहिती हाती येणार आहे. प्रथमदर्शनी हा अपघातच आहे, असे स्पष्ट होत असले, तरी सर्व शक्यता गृहित धरुन चौकशी करण्याचा आदेश देण्यात आला आहे. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार दोन्ही गाड्या एकमेकींवर आदळल्या, तेव्हा त्यांचा वेग अतिअधिक नव्हता.
दहा लाख रुपयांची भरपाई
या अपघातात मृत झालेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येक मृतामागे 10 लाख रुपयांची भरपाई देण्याची घोषणा रेल्वे विभागाने मंगळवारी रात्री उशीरा केली आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णूदेव साय यांनी अपघातासंबंधी दु:ख व्यक्त केले आहे. ते आपत्तनिवारण दलांच्या संपर्कात असून बचाव कार्यावर लक्ष ठेवत आहेत. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनीही साहाय्यता कार्यावर लक्ष ठेवलेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या अपघाताची माहिती देण्यात आली असून त्यांनीही दु:ख व्यक्त केले आहे. साहाय्यता कार्यासाठी आवश्यक साधनसामग्री कमी पडू दिली जाणार नाही, असे रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ठ केले आहे.
मानवी चूक कारणीभूत ?
ड या अपघातासाठी मानवी चूक कारणीभूत असल्याचा प्राथमिक निष्कर्ष
ड मध्यरेल्वेची वाहतूक व्यवस्था या अपघातामुळे अनेक तास होती खंहित
ड साहाय्यता कार्यात स्थानिक नागरीकांचेही योगदान, अनेकांचे वाचले प्राण
ड प्रत्येक मृतामागे 10 लाख रुपयांची भरपाई रेल्वे विभागाकडून घोषणा