म्हैसूरमध्ये कावेरी नदीत बुडून 6 जणांचा मृत्यू
उरूसमध्ये सहभागी होण्यासाठी आले होते : मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर
बेंगळूर : कावेरी नदीत बुडून 6 जणांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी म्हैसूर जिल्ह्यात घडली. उरूस असल्याने 8 जण कृष्णराजनगर येथील दर्ग्याला आले होते. यावेळी अर्केश्वर मंदिराजवळ नदीत 6 जण बुडाले. घटनेची माहिती समजताच मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सोशल मीडिया अकाऊंट ‘एक्स’वर मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या. तसेच प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा केली. म्हैसूर जिल्ह्यातील पृष्णराजनगर येथे रविवारी एका दर्ग्यात उरूस असल्याने बेंगळूर आणि उटी येथून मोठ्या संख्येने भाविक जमले होते.
बेंगळूर, उटी आणि म्हैसूरमधून आलेले काहीजण अर्केश्वर मंदिराजवळ नदीपात्रात आंघोळीसाठी उतरले. यावेळी नदीच्या प्रवाहामुळे सहा जणांचा बुडून मृत्यू झाला. बेंगळूरमधील यासिन (वय 23) आणि हैमा (वय 13) तसेच उटी येथील फातिमा (वय 38), म्हैसूर जिल्ह्यातील नेहा (वय 20), उमेर (वय 7), आणि अफिया (वय 20) अशी मृतांची नावे आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत मृतदेह बाहेर काढण्याचे पोलिसांकडून प्रयत्न सुरू होते. मृतदेह म्हैसूरमधील इस्पितळात हलविण्यात आले आहेत.
चिक्कमंगळूरमध्ये शेततळ्यात दोन कामगार बुडाले
चिक्कमंगळूर तालुक्यातील बन्नूर येथे शेततळ्यात पोहोण्यासाठी गेलेल्या दोन कामगारांचा बुडून मृत्यू झाला. रविवारी ही घटना घडली आहे. रमेश (वय 27) आणि महेश (वय 34) अशी मृतांची नावे आहेत. ते कोप्प तालुक्यातील जयपूर गावचे रहिवासी असून बन्नूरमधील कॉफी बागायतीमध्ये काम करत होते. तीव्र उन्हामुळे दोघेही शेततळ्यात पोहोण्यासाठी उतरले होते. दुपारी इतर कामगारांना शेततळ्याजवळ चप्पल व कपडे आढळून आले. त्यांनी तातडीने ही माहिती कोप्प पोलिसांना दिली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या मदतीने दोघांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले.