गोवा, कर्नाटकची मद्यतस्करी रोखण्यास 6 नाके
कोल्हापूर :
थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर गोव्यातून मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात बंदी असणाऱ्या दारुची तस्करी केली जाते. यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने 6 ठिकाणी तपासणी नाके उभारले असून, 9 भरारी पथके गस्तीसाठॅ तैनात केली आहेत. अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्नेहलता नरवणे यांनी दिली.
जुन्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी थर्टी फर्स्ट रोजी प्रत्येकजण आपापल्या पध्दतीने पार्ट्यांचे आयोजन करतात. थर्टीफर्स्टच्या पार्टीमध्ये ‘दारू‘ महत्वाची असते. महाराष्ट्रापेक्षा गोव्यात दारूचे दर कमी आहेत. त्यामुळे गोव्यातून चोरट्या मार्गाने कोल्हापूरसह शेजारच्या जिह्यात दारुची आयात करण्याची तरुणांची धडपड सुरू असते. तसेच कोल्हापूरातील काही बिअर शॉपी, वाईन्स शॉपमध्ये तस्करी करुन कमी दराने गोव्यातील मद्याची आयात केली जाते. ही तस्करी रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्कविभागाने आत्तापासूनच कंबर कसली आहे. गोवा व कर्नाटकातून कोल्हापूर जिह्यात प्रवेश करण्राया सहा ठिकाणी चेक नाके तैनात केले आहेत. एका नाक्यावर दुय्यम निरीक्षक व दोन कॉन्स्टेबल असतात. अशा सहा नाक्यांवर 15 डिसेंबरपासून बंदोबस्त लावण्यात आला आहे. 25 डिसेंबर ते 2 जानेवारी या कालावधीत 9 भरारी पथके संपूर्ण जिह्यातील दारू दुकाने पार्ट्यांवर टेहाळणी करणार आहेत.
परवाना घेवूनच दारु प्या
शासनाकडून मद्यपींसाठी दारू पिण्यासाठी परवाना हा बंधनकारक केला आहे. विना परवाना दारू पिणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होऊ शकते. 1 दिवसासाठी देशी 2 तर विदेशी 5 रुपयांचा परवाना मिळतो. 1 वर्षासाठी शंभर तर 1 हजारात आजीवन परवाना मिळतो. हे परवाने ऑनलाईन अर्ज केल्यानंतर मिळतात. वन डे परवाने वाईन शॉपमध्ये उपलब्ध आहेत. तसेच पार्टी करणार असाल तर त्याला काही नियम व अटी आहेत. दारू कोणती वापरणार? कोठून विकत घेणार याची माहिती द्यावी लागते. कौटुंबिक पार्टीसाठी 6 हजार तर व्यावसायीक पार्टीसाठी 24 हजार रुपये भरून परवाना घ्यावा लागतो. मात्र जागा बंदिस्त हवी, पार्टीचा इतरांना त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी लागते. अन्यथा परवाना मिळत नाही.