दूरसंचार ग्राहक संख्येत 69.6 लाख नवीन वापरकर्त्यांची भर
एप्रिलमधील आकडेवारी : ट्रायच्या अहवालामधून माहिती : यामध्ये वायरलेस, ब्रॉडबँड ग्राहकांचा अधिकचा वाटा
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
देशात दूरसंचार सेवांचा वापर सातत्याने वाढत आहे. एप्रिल महिन्यात भारताच्या दूरसंचार ग्राहक संख्येत सुमारे 69.6 लाख नवीन वापरकर्त्यांची भर पडली आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, या वाढीमध्ये वायरलेस आणि ब्रॉडबँड वापरकर्त्यांचा सर्वात मोठा वाटा आहे. अहवालानुसार, देशातील टेलिफोन ग्राहकांची एकूण संख्या आता 1.34 अब्ज झाली आहे. एप्रिल महिन्यात सर्वाधिक नवीन वापरकर्ते एअरटेलमध्ये सामील झाले. एप्रिलमध्ये भारती एअरटेलने सर्वाधिक 31.3 लाख नवीन ग्राहक जोडले, त्यानंतर जिओचा क्रमांक लागतो. रिलायन्स जिओने याच कालावधीत आपल्या नेटवर्कमध्ये 29.4 लाख नवीन वापरकर्ते जोडले आहेत. याशिवाय, व्होडाफोन आयडियाने 53,257 नवीन वापरकर्ते जोडले आहेत. तसेच, सरकारी दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच बीएसएनएलने 76,175 नवीन ग्राहक जोडले आहेत. माहितीनुसार व्होडाफोन आयडिया कंपनीसाठी हा सलग तिसरा महिना आहे, ज्यात कंपनीच्या वापरकर्त्यांमध्ये वाढ झाली आहे.