राज्यात 6.23 टक्के पर्यटकांत वाढ
पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांची माहिती : 5.36 टक्के देशी, तर 29.33 टक्के विदेशी
पणजी : गोवा राज्य 2025-26 या नवीन पर्यटन हंगामाचे स्वागत करत असताना, गोव्याच्या पर्यटनक्षेत्रात लक्षणीय वाढ नोंदवली गेली आहे. जानेवारी ते सप्टेंबर 2025 या कालावधीत गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत यंदा गोव्यात पर्यटकांच्या संख्येत एकूण 6.23 टक्के वाढ झाली आहे. देशी 5.36 टक्के तर 29.33 टक्क्यांनी विदेशी पर्यटक वाढले आहेत. 2025 मध्ये 72,96,068 देशी, तर 3,36,031 इतके आंतरराष्ट्रीय पर्यटक गोव्यात आले. गोव्याच्या जीडीपीमध्ये पर्यटनाचा वाटा सुमारे 16.43 टक्के आहे आणि प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या 40-45 टक्के संधी निर्माण हा व्यवसाय करतो, अशी माहिती पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी दिली.
पाटो येथील पर्यटन भवनात काल शुक्रवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत खंवटे यांनी पर्यटन वृद्धीविषयक माहिती दिली. यावेळी पर्यटन संचालक केदार नाईक, जीटीडीसीचे मार्केटिंग आणि हॉटेलचे महाव्यवस्थापक गेविन डायस, उपमहाव्यवस्थापक दीपक नार्वेकर उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या मुद्यावर मंत्री खंवटे म्हणाले, मर्यादित हवाई क्षमता असूनही, गोव्याने एकातेरिनबर्ग, कझाकस्तान, नोवोसिबिर्स्क आणि मॉस्को सारख्या नवीन स्थळांपर्यंत आपला विस्तार केला आहे, ज्यामुळे ऑक्टोबर 2025 मध्ये रशिया आणि मध्य आशियातून 34 चार्टर उड्डाणे झाली आहेत.
‘निज गोंयकार’ नवी योजना लवकरच
राज्यातील लोकांना सक्षम करण्यासाठी पर्यटन सुविधा कार्यक्रमाअंतर्गत 72 प्रमाणित सुविधा देणारे किंवा मार्गदर्शक आधीच कार्यरत आहेत. आता याशिवाय समुद्र किनाऱ्यावरील छायाचित्रण नोंदणी प्रणाली राबविण्यात येणार आहे. यासाठी स्थानिक उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी समुद्रकिनाऱ्यावरील छायाचित्रकारांसाठी गोव्यातील रहिवाशांसाठी (निज गोंयकार) ही एक नवीन योजना लवकरच सुरू केली जाईल. यापुढे दलाल व छायाचित्रकार व्यवसाय गोमंतकीयांकडे राहतील यासाठी धोरण करण्यात येणार आहे, असे मंत्री खंवटे यांनी सांगितले.
केंद्र सरकारकडून 472 कोटी मंजूर
अलिकडच्या काळात स्वदेश दर्शन, टाउन स्क्वेअर, युनिटी मॉल, छत्रपती शिवाजी महाराज डिजिटल संग्रहालय यासारख्या प्रमुख पर्यटन प्रकल्पांसाठी केंद्र सरकारकडून 472 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. गोवा पर्यटन पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी तसेच अर्थव्यवस्था विकसित करण्याचे उद्दिष्ट गोवा सरकारने ठेवले आहे, असे खंवटे म्हणाले.
आयपीएस अधिकाऱ्याचा बेजबाबदारपणा : खंवटे
करंजाळे समुद्रकिनाऱ्यावर रापणकार मच्छीमारी व्यवसाय करतात. यामुळे या किनाऱ्यावर ‘ओशनमॅन इव्हेंट’ला पर्यटन खाते मान्यता देत नाही. पर्यटन खात्याची मान्यता नसतानाही आयपीएस अधिकाऱ्याच्या बेजबाबदारपणामुळे ‘ओशनमॅन इव्हेंट’ झाला. याबाबत आयोजकांना 50 हजार ऊपयांचा दंड ठोठावला आहे. शिवाय पोलिसातही याविषयी तक्रार नोंदविण्यात आली आहे. आयपीएस अधिकाऱ्यांनी गोमंतकीयांच्या भावनांचा विचार करायला हवा, असे मंत्री खंवटे यांनी बेकायदेशीर आयोजिलेल्या ‘ओशनमॅन इव्हेंट’बाबत विचारलेल्या प्रश्नावर सांगितले.