For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

श्रीलंकेत सापडले 582 सांगाडे

06:36 AM Aug 21, 2026 IST | Tarun Bharat Portal
श्रीलंकेत सापडले 582 सांगाडे
Advertisement

सामुहिक दफनभूमीचा खळबळजनक शोध

Advertisement

► वृत्तसंस्था/ कोलंबो

श्रीलंका या देशात एका मोठ्या सामुहिक दफनभूमीचा शोध लागला आहे. या दफनभूमीत 582 मानवी अस्थिपंजर सापडले असून ते बेपत्ता झालेल्या तामिळींचे असावेत अशी शक्यता आहे. या सांगाड्यांमध्ये महिला आणि बालकांचेही अनेक सांगाडे आहेत. या शोधामुळे साऱ्या जगात खळबळ उडाल्याचे दिसून येत आहे.

Advertisement

अनेक वर्षांपूर्वी श्रीलंकेत तेथील तामिळ नागरीकांच्या विरोधात तेथील प्रशासनाने मोठे हिंसक अभियान चालविले होते. हे अभियान श्रीलंकेच्या सार्वभौमत्वाचे संरक्षण करण्यासाठी असून ते श्रीलंकेचे विभाजन करु इच्छिणाऱ्या तामिळी वाघांच्या विरोधात आहे, असे प्रतिपादन तेथील प्रशासनाने केले होते. मात्र, या हिंसाचारात तामिळी वाघांसमवेत अनेक तामिळभाषिक निरपराध नागरीकांचेही बळी मोठ्या प्रमाणात गेले होते. श्रीलंकेच्या सेनेने हे अभियान चालविले. अत्यंत क्रूरपणे चालविलेल्या या अभियानात किमान 10 हजार तामिळभाषिक आणि तामिळी वाघांचे बळी पडले होते, असे वृत्त त्यावेळी प्रसिद्ध झाले होते. त्यावेळी अनेक तामिळ भाषिक बेपत्ता झाल्याचे आणि त्यांनी भारतात स्थलांतर केल्याचेही दावे श्रीलंका प्रशासनाकडून करण्यात आले होते. मात्र, या तामिळींची हत्या करण्यात येऊन त्यांचे मृतदेह दडवून ठेवण्यात आले आहेत, असा आरोपही आंतरराष्ट्रीय संस्थांकडून करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर आता या सामुहिक दफनभूमीचा शोध लागल्याने त्यावेळच्या अभियानात करण्यात आलेल्या अत्याचारांवर नव्याने प्रकाश पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

80 ते 90 च्या दशकात हिंसाचार

80 आणि 90 च्या दशकांमध्ये श्रीलंकेत मोठा हिंसाचार झाला होता. श्रीलंका सरकारने त्या देशाच्या उत्तर भागात मोठ्या संख्येने राहणाऱ्या तामिळ जनतेविरोधात पक्षपाती आणि अन्यायपूर्ण धोरण अवलंबिले होते. यामुळे तेथील तामिळभाषिक जनतेत मोठ्या प्रमाणावर असंतोष होता. या असंतोषाचे पर्यवसान तामिळी चळवळीत झाले आणि तामिळ टायगर्स किंवा तामिळी वाघ या संघटनेची स्थापना झाली होती. या संघटनेने श्रीलंका प्रशासनाच्या विरोधात सशस्त्र उठाव केला होता. श्रीलंका प्रशासनाच्या दृष्टीने ही संघटना दहशतवादी होती. याच संघटनेच्या विरोधात मोठ्या प्रमाणात लष्करी कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी श्रीलंकेत शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारताने आपली शांतीसेनाही पाठविली होती. तथापि, तेथील संघर्ष थांबला नव्हता. या पार्श्वभूभीवर आता सापडलेल्या सामुहिक दफनभूमीला आंतरराष्ट्रीय महत्व प्राप्त झालेले आहे.

Advertisement
Tags :

.