देशभरात 58 इंजिनियरिंग कॉलेज बंद
2025-26 शैक्षणिक वर्षामधील स्थिती : उत्तरप्रदेश अन् महाराष्ट्रात सर्वाधिक प्रमाण
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशननुसार (एआयसीटीई) 2025-26 शैक्षणिक वर्षादरम्यान देशभरात 58 इंजिनियरिंग महाविद्यालये वेगवेगळ्या कारणांमुळे बंद करण्यात आली, परंतु सध्या तेथे शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना स्वत:चे पदवी शिक्षण पूर्ण करण्याची अनुमती असणार आहे.
2025-26 दरम्यान एकूण 58 इंजिनियरिंग आणि टेक्निकल कॉलेज हळूहळू बंद (प्रोग्रेसिव्ह क्लोजर) बंद करण्यात आली. प्रोग्रेसिव्ह क्लोजरचा अर्थ ज्या शैक्षणिक वर्षासाठी ही मंजुरी देण्यात आली, त्या वर्षी संस्था प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ शकत नाही. परंतु वर्तमान विद्यार्थ्यांचे शिक्षण जारी राहणार असे एआयसीटीईच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे.
राज्यनिहाय आकडेवारी
या 58 संस्थांमध्ये सर्वाधिक अभियांत्रिकी महाविद्यालये उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्रात (प्रत्येकी 12) बंद झाली आहेत. यानंतर मध्यप्रदेश (8), तेलंगणा (4) आणि पंजाबचा (4) क्रमांक लागतो. यंदा आंध्रप्रदेश आणि राजस्थानात प्रत्येकी 3 महाविद्यालये बंद झाली. तर गुजरात, कर्नाटक आणि तामिळनाडूत प्रत्येकी 2 महाविद्यालये बंद झाली आहेत. हरियाणा, ओडिशा, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी एक कॉलेज बंद झाले आहे. या 58 संस्थांपैकी तीन सरकारी अनुदानप्राप्त होती, तर उर्वरित खासगी तत्वावर संचालित केली जात होती.
कोणत्या कारणांमुळे बंद?
2025-26 शैक्षणिक वर्षादरम्यान देशभरातील तांत्रिक आणि इंजिनियरिंग महाविद्यालयांमध्ये चालविण्यात येणारे 950 हून अधिक अभ्यासक्रम संपुष्टात आणले गेले आहेत. एआयसीटीई ‘प्रोग्रेसिव्ह क्लोजर’ आणि ‘पूर्णपणे बंद होणे (कम्प्लीट क्लोजर) यांच्यात फरक करते. प्रोग्रेसिव्ह क्लोजरमध्ये संस्था टप्प्याटप्प्याने बंद करण्यात येतात आणि नोंदणीकृत विद्यार्थ्यांना स्वत:चे शिक्षण पूर्ण करण्याची अनुमती दिली जाते. तर कम्प्लीट क्लोजरमध्ये अभ्यासक्रम पूर्णपणे बंद करण्यात येतात आणि प्रभावित विद्यार्थ्यांना दुसऱ्या संस्थांमध्ये प्रवेश दिला जातो. एआयसीटीई अनेक कारणांमुळे संस्था बंद करण्याचा आदेश देत असते, यात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे अल्प प्रमाण, आवश्यक फॅकल्टी नसणे, मूलभूत सुविधा आणि संचालनात्मक नियमांचे पालन न करणे सामील आहे.