‘टीव्हीएस’ला 577 कोटींचा नफा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपनी टीव्हीएस मोटर्सने आर्थिक वर्ष 2024-25 च्या पहिल्या तिमाहीत 577 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. एक वर्षाआधी समान तिमाहीमध्ये कंपनीने 468 कोटी रुपयांचा नफा कमावला होता. एप्रिल ते जून या कालावधीमध्ये टीव्हीएस मोटर्सने 8376 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे. मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये महसुलामध्ये 16 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. कंपनीच्या एकूण उत्पन्नामध्ये पंधरा टक्के वाढ झाली असून 8412 कोटी रुपये कंपनीने उत्पन्नाच्या रूपामध्ये प्राप्त केले आहेत.
समभागाचा परतावा
आर्थिक वर्ष 2023-24 च्या पहिल्या समान तिमाहीत 7275 कोटी रुपयांचे उत्पन्न कंपनीने प्राप्त केले होते. यावर्षी टीव्हीएस मोटर्सचे समभाग शेअर बाजारामध्ये जवळपास 45 टक्के इतके वाढले आहेत. कंपनीच्या समभागाने महिनाभरामध्ये 3.16 टक्के, 6 महिन्यांमध्ये 20 टक्के आणि एक वर्षभरामध्ये 84 टक्के इतका परतावा गुंतवणूकदारांना दिला आहे. कॅलेंडर वर्ष 2024 मध्ये 1 जानेवारीपासून ते आत्तापर्यंत पाहता कंपनीचा समभाग 22 टक्के इतका वधारला आहे. कंपनीचे बाजार भांडवल मूल्य 1.18 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
तिमाहीत 10 लाख गाड्यांची विक्री
पहिल्या तिमाहीमध्ये टीव्हीएसने 10.87 लाख गाड्यांची विक्री केली आहे. मागच्या वर्षी याच तिमाहीत 9.53 लाख गाड्यांची विक्री करण्यात आली होती. त्या तुलनेमध्ये पाहता यंदा तिमाहीत 14 टक्के विक्रीमध्ये वाढ दिसली आहे.