56 वर्षीय जेनिफर पुन्हा प्रेमात
हॉलिवूड अभिनेत्री जेनिफर एनिस्टनच्या जीवनात अनेकदा प्रेमाची एंट्री अन् एक्झिट झाली आहे. आता जेनिफर पुन्हा प्रेमात पाडली असून तिच्या आयुष्यात नवा जोडीदार दाखल झाला आहे. 56 वर्षीय जेनिफर ही जिम कर्टिसला डेट करत आहे. जेनिफरने याची घोषणा सोशल मीडिया पोस्टद्वारे केली आहे. तिच्या पोस्टनंतर जेनिफरच्या आयुष्यात जिम कर्टिस असून अधिकृत स्वरुपात दोघेही साथ असल्याबद्दल शिक्कामोर्तब झाले आहे. या जोडप्याने गुपचूपपणे एंगेजमेंट केली असल्याचा कयास वर्तविला जात आहे. जेनिफरने शेअर केलेल्या छायाचित्रात तिच्या बोटामध्ये अंगठी दिसून आली आहे. या अंगठीने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. जिम कर्टिस हिप्नोथेरेपिस्ट असून तो वेलनेस कोच देखील आहे. याचबरोबर तो लोकांना डिप्रेशन, एंक्झाइटी यासारख्या मानसिक आजारांमधून बरे करण्यास मदत देखील करतो. जेनिफर आणि जिम यांची भेट काही सामाईक मित्रांच्या माध्यमातून झाली होती. भावनिक ताळमेळ उत्तम राहिल्याने हळूहळू दोघेही परस्परांच्या प्रेमात पडल्याचे सांगण्यात येत आहे. जेनिफर ही हॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्री आहे. जेनिफर यापूर्वी जस्टिन थेरॉक्ससोबत रिलेशनशिपमध्ये होती, परंतु दोघेही वेगळे झाले होते. याचबरोबर ब्रॅड पिटसोबत जेनिफरचे रिलेशन राहिले, जे 2005 साली संपुष्टात आले होते.