Solapur News : मुख्यमंत्री समृद्ध गाव योजनेसाठी सोलापुरातील 55 गावांची निवड होणार
सोलापूरमध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज्य अभियानाला गती
सोलापूर : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज्य अभियानाला गती देण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक तालुक्यातील सर्वाधिक गुणांकन असलेल्या पाच अशा एकूण ५५ गावांची निवड करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली.
ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेला प्रोत्साहन देण्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज्य अभियान हे पुरस्कार अभियान ग्रामविकास विभागाकडून राज्य पातळीवर राबविण्यात येत आहे. त्याला गती देण्यासाठी प्राधान्याने जिल्ह्यातील ५५ गावांची निवड करण्यात येणार आहे.
योजनेतील गावांवर विशेष लक्ष देऊन विविध योजनेच्या माध्यमांतून गावात विकासकामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन तशा सूचना देण्यात आल्या आहेत.
लोकाभिमुख सक्षम पंचायत प्रशासन, स्वनिधी, सामाजिक दायित्व, लोकवर्गणीतून पंचायत राज्य संस्थांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, जलसमृद्ध स्वच्छ व हरित गाव निर्माण करणे, मनरेगा व इतर योजनांचे अभिसरण करणे, सामाजिक न्याय लोकसहभाग आणि श्रमदान, लोक चळवळीतून गावचा विकास करणे हे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज्य अभियानाचे मुख्य घटक आहेत. त्यामुळे या अनुषंगाने तयारी करण्यात येत असल्याचे सीईओ जंगम यांनी सांगितले.