थेट परकीय गुंतवणुकीत 55 टक्क्यांची घट
घटीसह गूंतवणूक 9.69 अब्ज डॉलरच्या घरात : एप्रिल ते डिसेंबरमधील आकडेवारीचा समावेश
नवी दिल्ली :
एप्रिल-डिसेंबर 2023 या कालावधीत भारतातील निव्वळ परकीय थेट गुंतवणुकीत (एफडीआय) 55.2 टक्क्यांची तीव्र घट झाली आहे. ती 2022 मध्ये याच कालावधीत 21.63 अब्ज डॉलर होती, जी आता 9.69 अब्ज डॉलरवर आली आहे. इक्विटी भांडवलाच्या परताव्यात वाढ झाल्यामुळे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या फेब्रुवारी 2024 बुलेटिननुसार, एप्रिल-डिसेंबर 2023 दरम्यान, भारतात 19.23 अब्ज एफडीआय आले आहे, तर 9.54 अब्ज डॉलर गुंतवणूक बाहेर गेली आहे.
2022 मधील याच कालावधीत, थेट विदेशी गुंतवणुकीचा प्रवाह 32.68 अब्ज डॉलर होता, तर परदेशातून 11.05 बिलियन डॉलर होता. आर्थिक वर्ष 24 च्या पहिल्या 9 महिन्यात भारतातील थेट गुंतवणूकदारांकडून पैसे काढणे/निर्गुंतवणूक वाढून 32.26 अब्ज डॉलर झाली आहे, जी एप्रिल-डिसेंबर 2022 मध्ये 22.81 अब्ज डॉलरची होती.
आरबीआयच्या अहवालानुसार
रिझर्व्ह बँकेच्या फेब्रुवारी 2024 च्या ‘स्टेट ऑफ द इकॉनॉमी’ अहवालानुसार, सुमारे 65 टक्के विदेशी गुंतवणूक उत्पादन, ऊर्जा आणि इतर ऊर्जा क्षेत्र, वाहतूक, वित्तीय सेवा आणि किरकोळ आणि घाऊक व्यापार क्षेत्रात आली आहे. सिंगापूर, मॉरिशस, अमेरिका, जपान, यूएई आणि नेदरलँड्सने या कालावधीत एकूण समभाग गुंतवणुकीपैकी तीन चतुर्थांश गुंतवणूक केली आहे.
एफडीआय इंटेलिजेंसनुसार, जागतिक स्तरावर जाहीर केलेले नवीन एफडीआय प्रकल्प 2022 मधील 156 वरून 2023 मध्ये 174 पर्यंत वाढले आहेत. 2023 मधील सर्वात लोकप्रिय एफडीआय क्षेत्रांमध्ये हरित ऊर्जा आणि डिजिटलायझेशन प्रकल्पांचा समावेश आहे.
भारत हा जगातील टॉप 10 देशांपैकी एक आहे जो 2024 मध्ये गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी मजबूत स्थितीत आहे. डेटा सेंटरची क्षमता वाढवणे हा भारताच्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा आहे. ही क्षमता यावर्षी 1 जीडब्लूपेक्षा जास्त झाली आहे आणि भारत जागतिक डेटा सेंटर बनण्याच्या तयारीत आहे.