54 वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गोवा
‘75 क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो’ या उपक्रमाचे थाटात उद्घाटन
भारत सरकार रोजगार निर्मितीसाठी, निर्मात्यांच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी, उत्कृष्ट कलाकारांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि तऊणांना चित्रपट क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी वचनबद्ध असल्याचे आश्वासन केंद्रीय माहिती आणि प्रसारण, युवा व्यवहार आणि क्रीडामंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी येथे सुरु असलेल्या 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) ’75 क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो’ या उपक्रमाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी बोलताना दिले. 48 तासांचे फिल्म मेकिंग चॅलेंजमधील विजेत्यांचे मंत्री ठाकूर यांनी कौतुक केले. ‘क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो’ हा देशाच्या तळागाळातील तरूणांना प्रोत्साहन आणि मार्गदर्शन करण्याचा सरकारचा एक प्रयत्न आहे. यंदा या उपक्रमात भारतातील तब्बल 19 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील युवांचा समावेश आहे.
देश कोणताही असो, मानवी भावना एकसारख्याच : गॅट
देश कोणताही असो, मानवी भावनांची सार्वत्रिकता अद्भूत आहे. म्हणुनच टेक्साससारख्या प्रदेशातील एका कथेला सुद्धा जगभरात सारखाच प्रतिसाद मिळतो, असे प्रतिपादन इफ्फीतील ’कॅचिंग डस्ट या ओपनिंग फिल्मचे दिग्दर्शक स्टुअर्ट गॅट यांनी केले. इफ्फीनिमित्त गोव्यात आलेले गॅट पीआयबीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यावेळी सह-निर्माते मार्क डेव्हिड आणि जोनाथन कॅट्झ यांचीही उपस्थिती होती. पुढे बोलताना गॅट यांनी, मानवी भावनांवर चित्रपटाचा ’फोकस’ विशद केला. त्याचबरोबर शॉर्ट फिल्म्सपासून फीचर फिल्म्सपर्यंतच्या आपल्या वाटचालीचीही त्यांनी माहिती दिली. या क्षेत्रात ’थकवा’ या शब्दाला काहीच मोल नसते, असेही ते म्हणाले. आपल्या पदार्पणाच्या चित्रपटासाठी गडद विषय निवडण्याबद्दल बोलताना त्यांनी, आपण मानवी मानसशास्त्राच्या गडद पैलूंचा शोध घेत असतो, असे सांगितले. विषय निवडण्यात कदाचित आपल्या बालपणाचाही प्रभाव असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. निर्मार्ते मार्क डेव्हिड यांनी बोलताना, एका शॉर्ट फिल्मनिमित्त एकत्र आल्यानंतर स्टुअर्ट यांच्याशी त्यांचे नाते कसे वृद्धींगत होत गेले आणि पुढे ते कसे विकसित झाले त्यासंबंधी माहिती दिली.
पुढे बोलताना त्यांनी, कॅनरी आयलंड्समध्ये चित्रपटाच्या शूटिंगच्या आव्हानांवर प्रकाश टाकताना वादळी, धूळयुक्त परिस्थिती आणि 35 मिमी चित्रपटाच्या शूटिंगमधील आव्हानांचा उल्लेख केला. ‘35 मिमी मूव्ही कॅमेऱ्याच्या मॅगझिनचा आवाज तातडीची आणि समयसूचकतेची भावना निर्माण करतो. याऊलट डिजिटलमध्ये शूटिंगमुळे आरामशीर वृत्ती निर्माण होते, असे ते म्हणाले. सुऊवातीच्या चित्रपटासाठी निवड झाली तो क्षण आपल्या आयुष्यातील सर्वात अभिमानाचा होता, असे ते म्हणाले. आपली आई भारतीय तर वडील इटालियन स्थलांतरित, अशा परिस्थितीत युके मध्ये खडतर जीवन जगले. आपल्या जीवनाची नाळ भारताशीही जोडली असल्यामुळे भारतीय चित्रपटही करण्यास आवडेल, असे त्यांनी सांगितले. सुमारे 96 मिनिटांच्या या चित्रपटाची पटकथा स्टुअर्ट गॅट यांची मार्क डेव्हिड, जॉन कॅटझ हे निर्माते आहेत. या चित्रपटा एरिन मोरियार्टी, जय कोर्टनी, दिना शिहापी, रायन कौर यांच्या भूमिका आहेत.
मी लोकांच्या मनात आहे तो फक्त चित्रपटांमुळेच! अभिनेता सनी देओल यांचे उद्गार
फक्त अभिनेता बनायचं होतं म्हणून चित्रपटसृष्टीत आलो. धमेंद्रसारखे चित्रपट करायचे होते. उत्तम दिग्दर्शक नसतानादेखील चित्रपट केले. काही चालले, काही फ्लॉप ठरले. परंतु आजपर्यंत जो काही लोकांच्या मनात आहे तो फक्त चित्रपटांमुळेच आहे असे मत प्रसिद्ध अभिनेता सनी देओल यांनी 54 व्या आंचिममध्ये आयोजित ‘इन कन्व्हर्सेशन’मध्ये बोलताना व्यक्त केले. यावेळी दिग्दर्शक राजकुमार संतोषी, अनिल शर्मा उपस्थित होते. आपण गदर चित्रपट केला. या चित्रपटामुळे वेगळीच प्रेरणा मिळाली. आयुष्यात मी कधीच हार मानली नाही. कायम पुढे चालत राहिलो. आतापर्यंत जे चित्रपट केले ते कथांच्या आधारावर केले. कथा आवडली की मी त्यात गुंतून जातो. आता लवकरच ‘1947 लाहोर’ येणार आहे. अनिल शर्मा यांच्यासोबतचा प्रवास अत्यंत रोमांचक होता. गदरनंतर ‘गदर 2’ करायचा ठरविला, तेव्हा मी खूप घाबरलो होतो. कारण यापूर्वी ‘घायल’चा रिमेक केला होता तो गाजला नव्हता. त्यामुळे गदर 2 करण्याबाबत विरोधात्मक मत होते. परंतु या चित्रपटाचे यश पाहता मी चुकीचा ठरलो. गदर 2 चित्रपटाने अक्षरश: लोकांच्या मनात घर केले असे सनी देवल यांनी सांगितले. सनी देओल यांच्यात एक वेगळे प्रकारची ताकद आणि क्षमता आहे जी त्यांना वडिलांकडून वारसा म्हणून मिळाली आहे. त्यांनी कधीच दिग्दर्शनावेळी वाद केले नाहीत. गदर 2 चित्रपटाचे कथानक तयार असले तरी चित्रपटस्वरूपात आणण्याकरिता आम्हाला सहा वर्षे लागली, अशी माहिती दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी दिली. तसेच सनी देवलची अभिनयाची क्षमता ही चित्रपटसृष्टीने कधीच समजली नाही. सनी हे दिग्दर्शकांसाठी वरदान आहे, असे उद्गार अनिल शर्मा यांनी यावेळी काढले.
अन् सनी देवल यांचे डोळे पाणावले.
इन कन्व्हर्सेशन सत्राची सनी देवल यांच्या गाजलेले संवाद ‘ढाई किलो का हाथ’ आणि गदरमधला ‘हिंदुस्थान जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा’ यांनी सुरूवात झाली. याचदरम्यान दिग्दर्शकांनी सनी देवल यांच्या अभिनयाची तसेच त्यांच्या स्वभावाचे किस्से सांगितल्यानंतर सनी देवल यांचे डोळे पाणावले.
अभिनेत्री माधुरी दीक्षितचा विशेष पुरस्काराने सन्मान
54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) अभिनेत्री माधुरी दीक्षितला भारतीय चित्रपटातील योगदानासाठी ‘विशेष’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. चार दशकांच्या उल्लेखनीय कारकिर्दीसह माधुरी दीक्षितने भारतीय चित्रपट उद्योगावर अमिट छाप सोडल्याने केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते तिला सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल देऊन सन्मानित करण्यात आले. अभिनयाला जिवंत करण्याच्या माधुरी दीक्षितच्या क्षमतेने पिढ्यानपिढ्या प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. ‘भारतीय सिनेमातील योगदानासाठी विशेष ओळख’ पुरस्कार हा माधुरी दीक्षितच्या अपवादात्मक कामगिरीचा आणि भारतीय सिनेमावरील तिच्या कायम प्रभावाचा पुरावा आहे. 1980, 90 आणि 2000 च्या दशकाच्या सुऊवातीच्या हिंदी चित्रपटांमधील मुख्य अभिनेत्री म्हणून माधुरी दीक्षितला सहा फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. तिला विक्रमी चौदा वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. माधुरी दीक्षितने ‘अबोध’ (1984) मधून चित्रपटात पदार्पण केले आणि ‘तेजाब’ (1988) द्वारे तिला व्यापक लोकमान्यता मिळाली. 2014 मध्ये तिची भारतातील युनिसेफ सदिच्छा दूत म्हणून नियुक्ती झाली होती.