54 वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गोवा 23 नोव्हेंबर 2023
चित्रपटांमध्ये सार्वत्रिक वैश्विकता घटक असावा : ज्युरी अध्यक्ष अरविंद सिन्हा यांचे मत
डिजिटल मीडियाच्या उदयामुळे तंत्रज्ञान सुगम्यता वाढली आहे, ज्यामुळे अनेकजण चित्रपट निर्मितीमध्ये येत आहेत. तंत्रज्ञान हा मुख्य घटक असला तरी, सौंदर्यशास्त्र, बुद्धीमत्ता, कौशल्ये, मूल्ये आणि परिपूर्णता या कलेचे महत्त्वपूर्ण घटक कायम असतील, असे मत इंडियन पॅनोरमा नॉन-फीचर फिल्म्स ज्युरीचे अध्यक्ष अरविंद सिन्हा यांनी 54 व्या इफ्फीमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले. तपूर्वीच्या तुलनेत आजकाल काल्पनाधिष्ठीत चित्रपटांवर अधिक भर आणि लक्ष दिले जात आहे आणि माहितीपट बनवण्याचे प्रमाण कमी झाले आहे. डिजिटल माध्यमे आणि तंत्रज्ञानाच्या शोधामुळे चित्रपट निर्मितीची सुगम्यता वाढल्यामुळे हा बदल झाला असेल. माहितीपटांच्या निर्मितीसाठी निधीची कमतरता आहे आणि आजकाल त्यासाठी स्वत:च निधी पुरवला जातो. माहितीपटांचा दर्जा खालावला असून आपण वास्तविकतेचे दर्शन घडवणारे उत्तम काम प्रेक्षकांसमोर आणायची गरज आहे. कालबाह्य शैली टाळून आणि तऊण पिढीला अनुरूप माहिती, सामुग्री यावर लक्ष केंद्रित करून माहितीपट पुनऊज्जीवित करण्याची आवश्यकता आहे, अशी खंत पौशाली गांगुली यांनी व्यक्त केली.
चला जाऊया मूक रामलीलेला ...
रामलीला या प्रकाराबद्दल प्रत्येकाने ऐकले आणि काहींनी तर पाहिले पण असेल. परंतु मूक रामलीलेबाबत क्वचितच कुणी ऐकले असेल. मूक रामलीला हा तसा भरपूर जुना प्रकार असून शस्त्रविद्या शिकविण्याच्या माध्यमातून मूक रामलीलेचा जन्म झाला. अजूनही राजस्थानातील बिसाऊ या गावात मागील 80 वर्षापासून मूक रामलीलाची परंपरा टिकवून ठेवली आहे. ही मूक रामलीला आज गुरूवार दि. 23 रोजी हॉटेल मेरियॉट येथे सुरू असलेल्या फिल्म बाजारमध्ये सादर करण्यात येणार आहे. मूक रामलीलेबाबत जाणून घेण्यासाठी तरूण भारतच्या प्रतिनिधीने निर्माता रजनी आचार्य यांच्याशी संवाद साधला.
बिसाऊची 80 वर्षापासून परंपरा
बिसाऊ येथील मूक रामलीला ही जगप्रसिद्ध आहे. शारदीय नवरात्रात रामलीलेला सुरूवात होते आणि 15 दिवस ही रामलीला सादर केली जाते. राजस्थानातील बिसाऊ गावात मूक रामलीला मागील 80 वर्षापासून सादर केली जात आहे. गावातील लोकसुद्धा रामलीला करतात. ही मूक रामलीला इतर रामलीलेसारखीच दिसत असली तरी यात पात्रांचा संवाद नसतो. त्यामुळे ती सर्वांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरते. विशेष म्हणजे जो लहानपणी रामाची भूमिका करतो तो मोठेपणी रावणाची भूमिका करतो. ही परंपरा आजपर्यंत सुरू आहे.
तब्बल 100 कलाकारांचा समावेश
लोककलाप्रकार लोकांपर्यंत पोहचण्यासाठी...
पथनाट्याप्रमाणे बिसाऊंच्या रस्त्यावर पूर्ण सेट उभारून ही मूक रामलीला सादर केली जाते. या रामलीलांमध्ये संवाद नसले तरी पार्श्वगायन, पार्श्वसंगीत या प्रकारचा समावेश असतो. पार्श्वगायनात चौपाई, दोहे म्हटले जातात. मूक रामलीला ही बिसाऊची परंपरा आहे आणि हीच परंपरा आणि लोककलाप्रकार लोकांपर्यंत पोहचावा यासाठी चित्रपटस्वरूपात तयार करण्यात आला आहे असे रजनी आचार्य सांगतात.
‘गांधी टॉक्स’ चित्रपटाने वेधले लक्ष
गोव्यात सुऊ असलेल्या 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ’गांधी टॉक्स’ या चित्रपटाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या चित्रपटात अभिनेते विजय सेतुपती, अदिती राव हैदरी, अरविंद स्वामी आणि सिद्धार्थ जाधव यांसारख्या सुप्रसिद्ध कलाकारांनी भूमिका केल्या आहेत. ‘गांधी टॉक्स’ हा इफ्फी महोत्सवात सादर होणारा पहिलाच मूक चित्रपट आहे. दर्जेदार मूक चित्रपटांचा काळ पुन्हा एकदा अनुभवण्याची संधी चित्रपट रसिकांना देणे हा या चित्रपटाच्या प्रदर्शनामागील उद्देश आहे. हा चित्रपट, चलनी नोटांवर विराजमान गांधी आणि ज्यांचे आदर्श आपल्यापैकी प्रत्येकजण आत्मसात करू इच्छितो, ते गांधीजी या दोन ऊपांत विभागलेल्या गांधी या व्यक्तिमत्त्वाबद्दल भाष्य करतो. चित्रपटाबाबत माहिती देताना निर्माते शारिक पटेल यांनी पुढे सांगितले की संवाद साधण्यासाठी दिग्दर्शकाने केलेला केवळ दृश्य माध्यमाचा वापर ही अत्यंत रोचक संकल्पना आहे. विजय, अदिती, अरविंद, सिद्धार्थ यांसारख्या नामवंत कलाकारांच्या मांदियाळीने आम्हांला चित्रपट निर्मिती करण्यासाठी आवश्यक आत्मविश्वास दिला. साऊंडट्रॅकची रचना करण्यासाठी ए. आर. रेहमान यांनी संमती देणे म्हणजे पुरणपोळीवर साजूक तुपाची धार धरण्यासारखे ठरले, असे निर्माते म्हणाले. अभिनेते विजय सेतुपती म्हणाले, न्याय नेहमी सत्यापेक्षा निराळेच असतो. सुऊवातीला चित्रपटाचा नायक चलनी नोटेवर असलेल्या गांधींवर प्रतिक्रिया व्यक्त करतो मात्र नंतर तो त्याच्या हृदयात असलेल्या गांधीजींवर प्रतिक्रिया द्यायला सुऊवात करतो. सदर चित्रपटात या द्वंद्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे.
‘द आर्चीज-मेड इन इंडिया’वर चर्चासत्र
आर्चीज चित्रपटाद्वारे आर्ची कॉमिकची निरागसता, भाबडेपणा आणि मैत्री आजच्या युवा पिढीसाठी दोन तासांच्या कथेत सादर करण्याचा हा प्रयत्न आहे, असे मत दिग्दर्शिका झोया अख्तर यांनी 54 व्या इफ्फीमध्ये ‘द आर्चीज - मेड इन इंडिया’ वरील ’इन कॉन्व्हर्सेशन’ सत्रात व्यक्त केले. आर्ची कॉमिकचे प्रचंड यश लक्षात घेऊन त्यातील सारांश आणि बारकावे टिपणे आणि प्रेक्षकांसाठी तो एक उत्तम सिनेमॅटिक अनुभव बनवणे खूप आव्हानात्मक होते. आर्चीने माझे बालपण व्यापून टाकले होते. यातील पात्रे प्रतिकात्मक आणि जागतिक स्तरावर लोकप्रिय आहेत, आणि कॉमिक वाचून मोठ्या झालेल्या आजच्या पिढीला पुन्हा त्या भावविश्वात नेणारा आणि आजच्या युवकांना त्याच्याशी जोडणारा चित्रपट सादर करताना पटकथा लेखनाचा संपूर्ण नवीन अनुभव दिला, असे त्या म्हणाल्या.
इंडियन पॅनोरमा राष्ट्राच्या सांस्कृतिक वैविध्याचे प्रतीक : ज्युरी अध्यक्ष डॉ. टी. एस. नागभरणा यांचे प्रतिपादन
वर्ष 1979 पासून मी इफ्फीत इंडियन पॅनोरमाचा भाग आहे. केवळ नऊ फिचर फिल्म आली होती तेव्हापासून होणाऱ्या या विकासाचा साक्षीदार आहे. इंडियन पॅनोरमा हा राष्ट्राच्या सांस्कृतिक वैविध्य आणि दृश्य साक्षरता वाढ यांचे प्रतीक आहे. एक सिनेप्रेमी म्हणून माझ्यासाठी हा प्रवास भारतीय सिनेमाच्या परिदृश्याचा व सामाजिक परिवर्तनाचा अमूल्य अभ्यास आहे, असे मत इंडियन पॅनोरमा फिचर फिल्म्स् विभागाचे ज्युरी अध्यक्ष डॉ. टी. एस. नागभरणा यांनी व्यक्त केले. 54व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी ए कार्तिक राजा, अंजन बोस, डॉ. इतिराणी समंता, के. पी. व्यासन, कमलेश मिश्रा, किरण गांती, मिलिंद लेले, प्रदीप कुरबाह, रमा विज, रोमी मेइतेई, संजय जाधव आणि विजय पांडे यांची उपस्थिती होती. चित्रपटात आशय आनी कौशल्य हें म्हत्वाचे मिश्रण आहे यावर त्यांनी भर दिला. चित्रपट निर्मितींत समर्पणाची तयारी ठेवण्याची गरज असते. त्याचबरोबर अर्थपूर्ण संलग्नतेसाठी काही मानवी घटकांवरही भर देणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. डॉ. नागभरणा हे 10 राष्ट्रीय पुरस्कार आणि 18 राज्य पुरस्कार प्राप्त करणारे कन्नड भाशेतील एक प्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते आहेत.