राज्यातील 54 पर्यटक नेपाळमधून सुखरुप परतले
23 रोजी हावेरी, शिमोग्यासह विविध जिल्ह्यातून गेले होते पर्यटनाला
त. भा. प्रतिनिधी/ बेंगळूर :
भूस्खलन आणि पुरामुळे नेपाळमध्ये अडकलेले कर्नाटकातील 54 जण सुखरुप परतले आहेत. नेपाळ-तिबेट सीमेवर 26 ऑगस्ट रोजी अचानक आलेल्या पुरामुळे अनेकांचे जनजीवन उद्ध्वस्त झाले. अनेक पर्यटक बेपत्ता झाले होते. राज्यातूनही अनेकजण नेपाळमध्ये पर्यटनासाठी गेले होते. त्यांचा नेमका आकडा अद्याप स्पष्ट झालेला नाही. 23 ऑगस्ट रोजी 54 पर्यटक हावेरी, शिमोग्यासह विविध जिल्ह्यांतून नेपाळमध्ये फिरण्यासाठी गेले होते. भोटे कोसी नदीच्या भागात रस्ते, पूल व अनेक पायाभूत सुविधा पुराच्या तडाख्यात उद्ध्वस्त झाले. पुरामुळे वाहतूक, संपर्कव्यवस्था विस्कळीत झाल्याने पर्यटकांमध्ये चिंतेचे वातावरण होते.
अखेर केंद्रीय परराष्ट्र मंत्रालय आणि राज्य सरकारच्या प्रयत्नांमुळे नेपाळमध्ये अडकलेले राज्यातील 54 पर्यटक सुखरुप परतले आहेत. उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथून विमानाने बेंगळूरला त्यांचे आगमन झाले. भीषण पुराच्या संकटातून पर्यटक घरी परतल्याने त्यांच्या कुटुंबीयांना सुटकेचा नि:श्वास सोडला.