कारवार अर्बन बँकेत 54 कोटीचा गैरव्यवहार
बँकेच्या हजारो ग्राहकांमध्ये विशेष करून ठेवीदारांमध्ये प्रचंड खळबळ
कारवार : येथील कारवार अर्बन को-ऑप. बँकमध्ये 54 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष चंद्रहास स्वार यांनी दिली. दरम्यान, कारवार जिल्ह्यातील प्रतिष्ठित सहकारी बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि सुमारे 120 वर्षांचा इतिहास लाभलेल्या या बँकेतील आर्थिक घोटाळा उघडकीस आल्याने बँकेच्या हजारो ग्राहकांमध्ये विशेष करून ठेवीदारांमध्ये प्रचंड खळबळ माजली आहे. कारवार नगराच्या अनेक आर्थिक घडामोडींचा साक्षीदार बनून राहिलेल्या कारवार अर्बन बँकेच्या दोन शाखा असून ठेवींची रक्कम 88 कोटी रुपये इतकी तर 90 कोटी रुपये इतके कर्ज वितरित करण्यात आले आहे. ग्राहकांची संख्या 5 हजार इतकी आहे. येथील पत्रकार भवनात पत्रकारांशी बोलताना स्वार पुढे म्हणाले, बँकेतील घोटाळ्याला बँकेचे जनरल मॅनेजर गुरुदास बांदेकर आहेत. गेल्या काही वर्षांपासून बांदेकर गैरव्यवहार प्रकरणात गुंतले होते. प्रत्येक वर्षी बँक ऑडिट होत असताना ते मॅनेज करत होते. बांदेकर यांचा 1 वर्षापूर्वी अपघातात मृत्यू झाला आहे. त्यांच्या अनुपस्थित बँकेचे ऑडिट करताना त्यांनी गैरव्यवहार केल्याचे उघडकीस आले आहे. बांदेकर यांनी गेल्या काही वर्षातून बँकेच्या ठेवी आपल्या नातेवाईकांच्या आणि ओळखीच्या व्यक्तींच्या नावावर वर्ग केल्या आहेत. बँकेतील गैरव्यवहाराची रितसर तक्रार कारवार शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. पोलीस प्रकरणाची चौकशी करीत आहेत. ठेवीदारांच्या ठेवी बँकेत सुरक्षित आहेत. त्यामुळे ठेवीदारांनी भीती बाळगण्याची काही एक गरज नाही, असे स्पष्ट करून स्वार पुढे म्हणाले, बँकेतील गैरव्यवहाराची चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील दोन-तीन महिने ठेवी परत करणे कठीण आहे. त्याकरिता ठेवीदारांनी बँकेच्या संचालक मंडळाशी सहकार्य करावे, असे आवाहन स्वार यांनी पुढे केले.
पैसे काढण्यासाठी ठेवीदारांची गर्दी
बँकेत घोटाळा झाल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरली आणि आपली रक्कम परत मिळविण्यासाठी ग्राहकांनी बँकेत गर्दी केली. तथापि, बँकेच्या कर्मचाऱ्यांनी हात वर केल्याचे सांगण्यात आले. कारवार नगरासह परिसरातील काही देवस्थानची खाती याच बँकेत आहेत. त्यामुळे देवस्थानची रक्कम परत मिळविण्यासाठी देवस्थान कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी बँकेकडे धाव घेतली होती.
संचालक मंडळाबद्दल अनेक तर्क-वितर्क
दरम्यान, बँकेच्या संचालक मंडळाबद्दलही अनेक तर्क-वितर्क व्यक्त केले जात आहेत. जनरल मॅनेजर बांदेकर गैरव्यवहार करीत आहेत हे माहित असूनही मंडळ इतकी वर्षे गप्प का राहिले? बांदेकर यांच्या मृत्यूनंतर त्यांच्यावर आरोप करून प्रकरण दाखल करणे कितपत योग्य? असे प्रश्न उपस्थित करून बँकेतील गैरव्यवहार प्रकरणी संचालक मंडळ आणि कर्मचाऱ्यांचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी ठेवीदारांच्याकडून केली जात आहे.