‘वैधमापन’चा 54 बियर बार चालकांना ‘करंट’
कोल्हापूर / कृष्णात चौगले :
मापात पाप करणाऱ्या जिह्यातील 54 बियरबार व परमिटरूमधारकांवर वैधमापनशास्त्र विभागाने कारवाई केली असून त्यांच्यावर खटले दाखल केले आहेत. एप्रिल ते डिसेंबर 2024 या आठ महिन्याच्या कालावधीत वैधमापनशास्त्र विभागाच्या विशेष मोहिमेमध्ये ही कारवाई केली आहे. अप्रमाणित पेगमेजर वापरून दारूची विक्री तसेच पडताळणी न केलेल्या पेगमेजरने दारूच्या विक्रीसह इतर कायदेशीर त्रुटी आढळल्याबद्दल बार चालकांविरोधात ही कारवाई केली आहे. वैधमापनच्या या तपासणी मोहिमेमुळे जिह्यातील बार चालकांचे धाबे दणाणले आहेत.
कोल्हापूर जिह्याच्या सहाय्यक नियंत्रण शास्त्र कार्यालयाकडून ग्राहकांना योग्य माप वजन व संख्येमध्ये वस्तू अथवा माल मिळावा यासाठी वजन मापांची पडताळणी करून दोषी घटकावर कारवाई केली जाते. वैधमापनकडून केलेल्या कारवाईमध्ये माल कमी देणे, घोषवाक्य नसलेले, किंमतीत खाडेखोड केलेल्या मालाची विक्री करणे, वस्तू व मालाची संख्या कमी असणे, छापील किंमतीपेक्षा जादा दराने पॅकबंद वस्तूची विक्री करणे, अप्रमाणित वजन, मापांनी ग्राहकांना वस्तू देणे, आदी प्रकारामध्ये दोषी आढळलेल्या घटकावर कारवाई केली जाते. गेल्या आठ महिन्यात वैधमापनशास्त्र विभागाने अनेक विशेष तपासणी मोहिमा राबवून ग्राहकांना लुटणाऱ्या विविध आस्थापनांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. तपासणीमध्ये दोषी आढळलेल्या आस्थापनांकडून गेल्या आठ महिन्यात 9 लाख 49 हजार रूपयांचा दंड वसूल केला आहे. तर 2 कोटी 17 लाख 14 हजार रूपये पडताळणी व मुद्रांक शुल्क वसूल केले आहे.
- 198 खटले दाखल, 25 सराफ व्यावसायिकांना दणका
वैधमापनशास्त्र विभागाने गेल्या आठ महिन्यांत एकूण 198 खटले दाखल केले आहेत. यामध्ये आवेष्टीत वस्तू जादा दराने विक्री केल्याबद्दल 8 खटले, आवेष्टीत वस्तुंवरील उद्घोषणा न छापल्याबद्दल 44, माल कमी दिल्याबद्दल 1, आणि वजन मापे संबंधी इतर उल्लंघन केल्याबद्दल 145 खटले दाखल केले आहेत. यामध्ये विशेषत: 25 खटले हे सराफ व्यवसायिकांवर दाखल केले आहेत. 54 खटले बियर बार, 22 खटले खते आणि बिबियाणे विक्रेत्यांवर आणि 5 खटले गॅस एजन्सीवर नोंद केले आहेत.
- कामकाजाच्या तुलनेत कर्मचारी संख्या अपुरी
कोल्हापूर जिह्यामध्ये कोल्हापूर, इचलकरंजी, कोडोली, कागल, गडहिंग्लज, शिरोळ या ठिकाणी दहा वैधमापन निरीक्षक कार्यालये आहेत. या कार्यालयामध्ये कर्मचारी संख्या ही जिह्याच्या व विभागाच्या कार्यभारानुसार कमी आहे. कार्यरत कर्मचाऱ्यांवरच कामाचा अतिरिक्त ताण पडत असून वजन, मापांसंबंधी कारवाई करताना देखील मर्यादा येत आहेत. शासनाने या विभागातील कर्मचारी संख्या वाढवावी अशी मागणी होत आहे.
- तक्रार असल्यास संपर्क साधा
वजन, मापे, काटे तपासणी करून, ग्राहकांना योग्य वजन, मापे व संख्येमध्ये मालाचा पुरवठा न करणाऱ्या आणि पॅकींग केलेल्या पण त्यावर इतर घोषवाक्य नसलेला माल विकणाऱ्या अनेक घटकावर कारवाई करण्यात आली आहे. या कार्यालयाकडून वजन काटयामध्ये दोष असणे, वस्तू, माल वजनाने अथवा संख्येने कमी देणे, मालाच्या पॅकींगवर ‘आयातदार, उत्पादक पत्ता नसणे,उत्पादन तिथीबाबत उल्लेख नसणे आदी प्रकारामध्ये दोषी आढळलेल्या विक्रेत्यावर कारवाई करण्यात येते. अशा पद्धतीच्या तक्रारी ग्राहकांस आढळल्यास त्यांनी तत्काळ सहाय्यक नियंत्रण वैधमापन शास्त्र कार्यालयाशी 0231 / 2547567 किंवा 2542549 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. अथवा प्रत्यक्षात येऊन तक्रार दाखल करावी .
डी.पी. पवार, सहाय्यक नियंत्रक वैधमापनशास्त्र विभाग, कोल्हापूर