गोव्यात दररोज 53 टक्के सांडपाणी कोणत्याही प्रक्रियेविना
अलीकडच्या काळात गोव्याने अभूतपूर्व विकास अनुभवला आहे. अनेक महत्त्वाचे प्रकल्प साकारले गेले आहेत. राज्यात उत्तम रस्ते आणि महामार्ग उपलब्ध आहेत आणि हे राज्य एक वैविध्यपूर्ण व उच्च-मूल्य असलेले आर्थिक आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून विकसित झाले आहे. काही अडथळे व स्पर्धेचा सामना करूनही, पर्यटन क्षेत्रात राज्याने आपले स्थान टिकवून ठेवले आहे मात्र या प्रतिमेमागे एक वाढती समस्या दडलेली आहे, ज्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
राज्यसभेत नुकत्याच सादर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात दररोज 176 दशलक्ष लिटर सांडपाणी निर्माण होते तर त्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता (ट्रीटमेंट कपॅसिटी) केवळ 87 दशलक्ष लिटर (श्थ्अ इतकीच आहे. म्हणजेच, दररोज निर्माण होणाऱ्या सांडपाण्यापैकी जवळपास 89 दशलक्ष लिटर (किंवा सुमारे 53 टक्के) सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया केली जात नाही. याचा अर्थ असा की, गोव्यातील निम्म्याहून अधिक सांडपाणी थेट पर्यावरणात मिसळत आहे. गोव्यातील केवळ 18 टक्के भागातच सार्वजनिक सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्यांचे (सीवर पाईपलाईन्स) जाळे पसरलेले आहे, ही बाब या समस्येला अधिक गंभीर बनविते. हे प्रमाण राष्ट्रीय सरासरी असलेल्या 28 टक्क्यांपेक्षा खूपच कमी आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर शहरी वाढ आणि पर्यटन व व्यावसायिक उपक्रमांचा वेगवान विस्तार यांच्याशी पायाभूत सुविधांचा विकास ताळमेळ राखू शकलेला नाही.
ज्या राज्याची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर पर्यटनावर अवलंबून आहे, अशा राज्यासाठी ही बाब चिंताजनक आहे. पर्यटक गोव्यातील स्वच्छ किनारे, नितळ पाणी आणि नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी येथे येतात. तरीही, ‘गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ’ आणि ‘केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ’ यांनी वारंवार अहवाल दिले आहेत की, कळंगुट, बागा, मिरामार व मोरजी यांसारख्या अनेक लोकप्रिय किनाऱ्यांवर ‘फेकल कोलिफॉर्म’ या जीवाणूंचे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त आढळले आहे. जलस्रोतांमध्ये हे जीवाणू धोकादायक प्रमाणात आढळून आले आहेत. याचे दुष्परिणाम केवळ सार्वजनिक आरोग्यापुरते मर्यादित नाहीत. प्रक्रिया न केलेले सांडपाणी किनारपट्टीच्या पाण्यातील पोषक घटकांचे प्रमाण घटविते, ज्यामुळे शेवाळाची अति-वाढ होते आणि पाण्यातील विरघळलेल्या
ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. कालांतराने, यामुळे सागरी परिसंस्थेचे नुकसान होऊ शकते आणि स्थानिक जैवविविधतेवर ताण येऊ शकतो. यात ऑलिव्ह रिडले कासवांच्या अंडी घालण्याच्या संवेदनशील जागांचाही समावेश आहे. ज्या भागात सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्यांचे जाळे नाही, तिथे ‘सोकपिट्स’ (शोषख•s) आणि ‘सेप्टिक टँक्स’वर अवलंबून राहिल्याने आणखी एक धोका निर्माण होतो.
सांडपाणी जमिनीत झिरपून भूगर्भातील पाणी दूषित करू शकते, ज्यावर अनेक किनारी वस्त्या पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून असतात. त्यामुळे 47 टक्के प्रक्रियेची ही आकडेवारी एक मोठी वास्तविकता दर्शविते. ती गोव्याच्या आर्थिक महत्त्वाकांक्षा व तेथील मूलभूत पायाभूत सुविधा यांच्यातील वाढती दरी उघड करते. हे राज्य दरवर्षी लाखो पर्यटकांचे स्वागत करते, ज्यामुळे मूळच्या कमी लोकसंख्येसाठी तयार केलेल्या यंत्रणेवर प्रचंड ताण येतो. पर्यटनातून महसूल मिळतो परंतु पर्यावरण रक्षण व अत्यावश्यक सार्वजनिक सुविधा बळकट करण्यासाठी आवश्यक असलेल्या गुंतवणुकीचा वेग त्या तुलनेत कमी राहिला आहे. बऱ्याचदा नवीन बांधकाम, हॉस्पिटॅलिटी प्रकल्प आणि पर्यटकांच्या संख्येवर भर दिला गेला आहे. स्वच्छतेकडे मात्र नंतर लक्ष दिले गेले आहे. आता प्रशासन ही समस्या गांभीर्याने घेऊ लागले आहे, अशी चिन्हे दिसत आहेत.
हॉटेल्स, ऊग्णालये आणि मोठ्या निवासी संकुलांना आयओटी-आधारित ऑनलाइन देखरेख प्रणाली बसविणे बंधनकारक करणे आणि त्याचे पालन न केल्यास दंडाची तरतूद करणे, यामुळे अंमलबजावणी अधिक मजबूत होऊ शकते. सांडपाणी वाहिन्यांचे जाळे विस्तारण्यासाठी ‘सिक्वेन्शियल बॅच रिएक्टर्स, मेम्ब्रेन बायो रिएक्टर्स आणि मायक्रो-टनलिंग’ यांसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करणे, हेदेखील एक स्वागतार्ह पाऊल आहे परंतु अनेक वर्षांच्या धोरणात्मक दुर्लक्षाची भरपाई तंत्रज्ञान करू शकत नाही.
गोव्याने सांडपाणी व्यवस्थापनाला एक दुय्यम सार्वजनिक बांधकाम समस्या न मानता, एक मुख्य पायाभूत सुविधा म्हणून पाहिले पाहिजे. सांडपाणी वाहिन्यांचे जाळे पणजी, वास्को आणि मडगावच्या पलीकडे, वेगाने विकसित होणाऱ्या किनारपट्टीच्या भागांपर्यंत विस्तारले पाहिजे. प्रक्रिया करण्यातील प्रचंड तफावत दूर करण्यासाठी विकेंद्रित प्रक्रिया प्रणाली, पिण्यायोग्य नसलेल्या कामांसाठी प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा व्यापक पुनर्वापर आणि सार्वजनिक संस्था व खासगी आस्थापने, या दोन्हींची अधिक कठोर जबाबदारी निश्चित करणे आवश्यक आहे. गोव्याचे नैसर्गिक पर्यावरण हे राज्याच्या अस्मितेचा आणि अर्थव्यवस्थेचा पाया आहे.
जर दररोज निर्माण होणाऱ्या सांडपाण्यापैकी निम्म्याहून अधिक सांडपाण्यावर प्रक्रिया न होणे सुरूच राहिले तर गोव्याने ज्या नंदनवनाच्या नावलौकिकाला जपले आहे, त्याच नंदनवनाला प्रदुषित करण्याचा धोका आहे. बऱ्याच ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांना विरोध होत आहे. तो देखील चुकीचा आहे. आणखीन किती वर्षे आपण सांडपाणी नाल्यांना सोडून देणार व ते कितपत योग्य आहे!
महेश कोनेकर