इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत 53 टक्क्यांची वाढ
ऑगस्टमधील एकूण वाहन विक्री 2.98 लाखावर : दुचाकी आणि व्यावसायिक विभागात नोंदवली वाढ
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
भारतात इलेक्ट्रिक वाहनांची म्हणजेच ईव्हीची मागणी वेगाने वाढत आहे. ऑगस्ट 2026 मध्ये देशात एकूण 2,98,448 इलेक्ट्रिक वाहने विकली गेली, जी गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या म्हणजेच ऑगस्ट 2025 च्या तुलनेत 52.9 टक्केपेक्षा अधिक आहे. या वाढीमुळे, ऑटोमोबाईल बाजारात ईव्हीचा वाटा 12.3 टक्के पर्यंत वाढला आहे, जो वर्षापूर्वी 9.5 टक्के इतका होता. ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन (फाडा) यांनी 8 ऑगस्ट रोजी ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. फाडाच्या मते, भारतातील इलेक्ट्रिक मोबिलिटीसाठी हा आतापर्यंतचा सर्वोत्तम ऑगस्ट महिना ठरला आहे. दुचाकी विभागात 67 टक्के वाढ, एकूण विक्रीत 60 टक्के वाटा राहिला आहे.
ऑगस्टमध्ये देशात 1,83,204 इलेक्ट्रिक दुचाकी विकल्या गेल्या. ऑगस्ट 2025 मध्ये हा आकडा 1,09,673 युनिट्स इतका राहिला होता. म्हणजेच, या सेगमेंटमध्ये 67.05 टक्केची वार्षिक वाढ नोंदवली गेली आहे. दुचाकी बाजारात ईव्हीचा वाटा 10टक्केपेक्षा जास्त आहे. आता, देशात विकल्या जाणाऱ्या एकूण इलेक्ट्रिक वाहनांपैकी 60 टक्के पेक्षा जास्त दुचाकी आहेत. व्यावसायिक वाहनांची विक्री तिप्पट झाली. ऑगस्ट 2026 मध्ये इलेक्ट्रिक व्यावसायिक वाहनांच्या विक्रीत सर्वात जलद वाढ दिसून आली. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये केवळ 1,631 व्यावसायिक ईव्ही विकल्या गेल्या होत्या, तर या वर्षी ऑगस्टमध्ये हा आकडा जवळपास तिप्पट होऊन 4,702 युनिट्सवर पोहोचला आहे. फाडा अध्यक्षांनी सांगितले, की प्रत्येक श्रेणीत ऑगस्टचा नवा विक्रम प्रस्थापित झाला. फाडाचे अध्यक्ष साई गिरीधर म्हणाले की, ऑगस्ट 2026 हा भारतातील इलेक्ट्रिक मोबिलिटीसाठी आतापर्यंतचा सर्वात मोठा ऑगस्ट महिना ठरला आहे. ईव्ही रिटेलच्या (दुचाकी, तीनचाकी, प्रवासी कार आणि व्यावसायिक) चारही श्रेणींनी ऑगस्ट महिन्यात नवीन विक्रम प्रस्थापित केले आहेत. कोणत्याही श्रेणीत विक्रम नाही.
या तेजीमागे तीन मुख्य कारणे...
- कमी देखभाल खर्च: पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींच्या तुलनेत इलेक्ट्रिक वाहनांचा देखभाल खर्च खूपच कमी असतो.
- चार्जिंग पायाभूत सुविधांचा विस्तार: देशातील लहान-मोठ्या शहरांमध्ये चार्जिंग स्टेशन्सची संख्या वाढत आहे.
- नवीन मॉडेल्स आणि पर्याय: वाहन उत्पादक कंपन्या परवडणाऱ्या किमतीत उत्तम मायलेज/रेंज देणारी नवीन ईव्ही मॉडेल्स बाजारात आणत आहेत.