‘वड’ महोत्सवांर्गत ५२ हजार वड रोपांची लागवड
कोल्हापूर वनवृत्तातील पाच वनविभागात बहरले वड
कोल्हापूर
महाराष्ट्र शासन वनविभागामार्फत २०२२ पासून वड महोत्सव साजरा करत आहे. या महोत्सवांर्गत तीन वर्षात कोल्हापूर वनवृत्तातील पाच वनविभागात वड, पिंपळ, उंबर, पिंपरण रोपे व फांद्या अशी ५२ हजार १८६ झाडांची लागवड करण्यात आली आहे. लागवड केलेल्या या झाडांचे संगोपनही केले जात आहे.
मुख्य वनसंरक्षक आर. एम. रामानुजन यांच्या संकल्पनेतून २०२२ पासून कोल्हापूर वनवृत्तामध्ये वड महोत्सव साजरा केला जात आहे. या महोत्सवात महिलांचा सहभाग मोठा आहे. २०२२ या वर्षात ५८६८, सन २०२३ मध्ये १०,६७८ आणि सन २०२४ मध्ये ३५,६४० रोपांची लागवड करण्यात आली आहे. कोल्हापूर वनवृत्तातील सर्वाधिक लागवड सातारा वनविभागात १९,७२४ इतकी झाली आहे. त्यानंतर कोल्हापूर १६,३२१ आणि सांगली वनविभागात ९८१५ इतकी लागवड झाली आहे. या लागवडीसाठी सर्व उपवनसंरक्षक, सहायक वनसंरक्षक, वनक्षेत्रपाल, वनपाल, वनमजूर यांनी परिश्रम घेतले आहेत. वड महोत्सवामुळे भविष्यात कोल्हापूर वनवृत्तामध्ये महाकाय जंगल तयार होईल असा विश्वास मुख्य वनसंरक्षक आर. एम. रामानुजन यांनी व्यक्त केला आहे.