भोपाळच्या जंगलात कारमध्ये सापडले 52 किलो सोने
11 कोटींची रोकड जप्त : दोन दिवसात 51 ठिकाणी छापे
वृत्तसंस्था/ भोपाळ
मध्यप्रदेशातील भोपाळला लागून असलेल्या मेंदोरी जंगलात प्राप्तिकर विभागाला एक बेवारस वाहन सापडले आहे. कारमध्ये सोने व रोख रक्कम असल्याची माहिती मिळाल्यानंतर प्राप्तिकर विभागाच्या जंबो टीमने तेथे छापा टाकला. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, त्या वाहनात 52 किलो सोने सापडले आहे. तसेच 10 कोटींची रोकडही सापडली आहे. या सर्व प्रकरणाचे धागेदोरे सौरभ शर्मा आणि त्याचा साथीदार चंदन सिंग गौर यांच्याशी जोडले गेल्याची चर्चा असली तरी तपास यंत्रणांकडून अधिकृतपणे कोणतीही माहिती जारी करण्यात आलेली नाही.
गुरुवार, 19 डिसेंबर रोजी पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास प्राप्तिकर विभागाच्या पथकाने एक इनोव्हा क्रिस्टा जप्त केली असून, त्यातून 52 किलो सोने जप्त करण्यात आले आहे. ही इनोव्हा क्रिस्टा एका रिकाम्या प्लॉटवर उभी होती असे सांगण्यात येत आहे. याची माहिती प्राप्तिकर विभागाला मिळाल्यानंतर छापे टाकण्यात आले. या कारमधून हस्तगत करण्यात आलेल्या सोन्याची किंमत सुमारे 42 कोटी रुपये असून 10 कोटी रुपयांची रोकडही जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणात सौरभ शर्मा या एका सेवानिवृत्त आरटीओ कर्मचाऱ्याचे नाव समोर आले आहे. ही गाडी त्याचा निकटवर्तीय चंदन सिंगची असल्याचे सांगितले जाते. तपास यंत्रणा आता या वाहनाच्या मालकाचा आणि सोन्याचा शोध घेण्यात व्यस्त आहे.
तीन दिवसांपासून कारवाई
भोपाळमध्ये गेल्या तीन दिवसांपासून वेगवेगळ्या तपास यंत्रणा कारवाई करत आहेत. ज्यांच्याकडून अनेक बेनामी संपत्ती असल्याची माहिती प्राप्त झाली आहे अशा काही बिल्डर्सवर प्राप्तिकर विभागाने कारवाई केली आहे. यामध्ये काही वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांचीही नावे समोर येत आहेत. दुसरी कारवाई लोकायुक्त पोलिसांनी आरटीओचे निवृत्त कर्मचारी सौरभ शर्मा यांच्यावर केली. या दोन्ही कारवाया एकमेकांशी संबंधित असल्याचे समजते.