For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बांगलादेशी टोळीविरुद्ध 509 पानांचे दोषारोपपत्र!

07:31 AM Jul 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
बांगलादेशी टोळीविरुद्ध 509 पानांचे दोषारोपपत्र
Advertisement

दोनापावला धेम्पो बंगला दरोडा प्रकरण : क्राईम ब्रँच कोर्टात सज्ज

Advertisement

त.भा. प्रतिनिधी

पणजी : दोनापावला येथील ‘धेम्पो विस्टा’ या बंगल्यात पडलेल्या बहुचर्चित आणि हायप्रोफाइल दरोड्याच्या गुह्यात गोवा क्राईम ब्रँचने काल बुधवारी जेएमएफसी कोर्ट, मेरशी येथे 509 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. या दरोड्याच्या गुह्यात 4 बांगलादेशी नागरिकांसह त्यांना कळंगुट येथे बेकायदेशीर आश्रय देणाऱ्या एका स्थानिक साथीदारावर गुन्हा निश्चित करण्यात आला आहे. या टोळीने वृद्ध धेम्पो दाम्पत्याला सुऱ्याच्या धाकावर बाथरूममध्ये डांबून हा थरारक दरोडा टाकला होता.

Advertisement

प्रसिद्ध व्यावसायिक अनिरुद्ध जयप्रकाश धेम्पो (वय 39) यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दिली होती. 20 एप्रिल 2025 रोजी रात्रीच्यावेळी दरोडेखोरांनी लोखंडी कटावणीच्या साहाय्याने मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून धेम्पो यांच्या वडिलांच्या बंगल्यात प्रवेश केला. बंगल्यात घुसल्यानंतर आरोपींनी केअरटेकरला अमानुष मारहाण केली. त्यानंतर वृद्ध दाम्पत्याच्या गळ्यावर सुरा ठेवून, ‘आवाज केल्यास जिवे मारू’ अशी धमकी दिली. दरोडेखोरांनी सर्वांचे हात-पाय बांधून त्यांना अनुक्रमे बेडरूम आणि बाथरूममध्ये कोंडले व घरातील 1 किलो सोन्याचे दागिने आणि 3 लाख रुपयांची रोकड लंपास करून पोबारा केला होता.

 दिल्ली पोलिसांच्या मदतीने ‘क्रॅक’ झाली केस

गोव्यात हा थरारक दरोडा टाकल्यानंतर ही आंतरराष्ट्रीय टोळी देशाबाहेर पळण्याच्या तयारीत होती. मात्र, गोवा क्राईम ब्रँच आणि दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने संयुक्त मोहीम राबवून एप्रिल 2026 मध्ये दिल्लीतून या टोळीच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर ट्रान्झिट रिमांडवर त्यांना गोव्यात आणून रीतसर अटक करण्यात आली. ....

 अटक झालेले सर्वजण बांगलादेशी

अटक करण्यात आलेल्यांमध्ये बांगलादेशी नूर इस्लाम उर्फ नदीम खान (रा. बागेरहाट, बांगलादेश), मोहम्मद सैफुल इस्लाम (रा. बागेरहाट, बांगलादेश), सोहेल खान (रा. बागेरहाट, खुलना विभाग, बांगलादेश),  मोहम्मद सुमन हौलादार उर्फ बाबू (रा. बागेरहाट, बांगलादेश), महमूद (सध्या रा. कलंगुट, गोवा - याने बांगलादेशी आरोपींना आश्रय दिला) अशी दोषारोप पत्रातील मुख्य संशयित आरोपींची नावे आहेत.

 ‘फॉरेनर्स अॅक्ट’ अंतर्गतही गुन्हे दाखल

तपासादरम्यान धक्कादायक बाब समोर आली की, अटक करण्यात आलेले सर्व मुख्य आरोपी हे मूळचे बांगलादेशी नागरिक असून त्यांनी कोणत्याही वैध विझा किंवा इमिग्रेशन कागदपत्रांशिवाय भारतात बेकायदेशीर प्रवेश केला होता. त्यामुळे त्यांच्यावर ‘फॉरेनर्स (अमेंडमेंट) अॅक्ट, 2004’ मधील कडक कलमांनुसार (बेकायदेशीर वास्तव्य आणि आरोपींना आश्रय देणे) गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. गुह्याचा सखोल तपास करून क्राईम ब्रँचने 30 साक्षीदारांचे जबाब, संशयितांची ओळख परेड, सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि जप्त केलेली सोन्याची नाणी यांसारखे भक्कम पुरावे कोर्टासमोर ठेवले आहेत. हा संपूर्ण तपास पोलिस निरीक्षक दत्तगुरु सावंत यांनी केला असून, त्यांना पोलिस अधीक्षक, जीवबा दळवी, आणि पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांचे थेट मार्गदर्शन लाभले.

सुरक्षित गोवा की गुन्हेगारांचे नंदनवन?

काही महिन्यांपूर्वी म्हापसा येथे झालेली चोरी आणि आता दोनापावला येथील दरोडा, या दोन्ही घटनांमध्ये याच टोळीचा हात असल्याचा संशय आहे. जर आंतरराष्ट्रीय गुन्हेगार गोव्याला आपले सॉफ्ट टार्गेट बनवत असतील, तर स्थानिक जनतेने आणि पर्यटकांनी सुरक्षेसाठी कोणाकडे पाहायचे. केवळ गुह्यानंतर दोषारोपपत्र दाखल करून चालणार नाही, तर परप्रांतीय व संशयित बांगलादेशी नागरिकांच्या बेकायदेशीर वास्तव्याविरोधात संपूर्ण गोव्यात तातडीने आणि व्यापक मोहीम राबवण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा, गोव्याची आंतरराष्ट्रीय स्तरावरील ओळख पुसली जाण्यास वेळ लागणार नाही.

Advertisement
Tags :

.