For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कडोलीत घर कोसळून 50 हजाराचे नुकसान

10:45 AM Jul 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
कडोलीत घर कोसळून 50 हजाराचे नुकसान
Advertisement

वार्ताहर/कडोली

Advertisement

कडोली येथे अति पावसामुळे एका घराची भिंत पडून सुमारे 50 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. दुसरीकडे पावसामुळे मार्कंडेय नदीच्या पुराचे पाणी दिवसेंदिवस वाढत चालल्याने शेतकऱ्यांची चिंताही वाढू लागली आहे. गेल्या आठ दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. कडोली परिसरातील नाले दुथडी भरुन वाहू लागले आहेत. अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली असून या झाडांच्या पडझडीमुळे गावचा वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. बुधवारी सायंकाळी पेठ गल्लीत शंकर पाटील यांच्या घराची भलीमोठी भिंत कोसळून त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सदर भिंतीशेजारी एक भाजीविक्रेता दररोज सायंकाळी भाजी विक्रीसाठी बसत असतो. पण नेमके त्याचदिवशी तो भाजीविक्री करण्यासाठी आला नाही. त्यामुळे त्या विक्रेत्याचे दैवबलवत्तर म्हणून त्याचा जीव वाचला. अन्यथा अनर्थ घडला असता.

मार्कंडेय नदीच्या वाढत्या पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ

Advertisement

संततधार पावसाचा जोर कायम असून मार्कंडेय नदीला महापूर येऊन नदीकाठची भात, ऊस व इतर पिके गेल्या चार-पाच दिवसांपासून पाण्याखाली गेली आहेत. पुराचे पाणी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे कडोली परिसरातील नदीकाठच्या शेतकऱ्यांची चिंता वाढत चालली आहे. आणखी चार-पाच दिवस पिके पाण्याखाली राहिली तर कुजण्याची शक्यता नाकारता येत नाही. नुकतीच भात रोपाची लागवड करण्यात आली होती. ही कोवळी भातरोपे कुजली तर दुबार भातरोप लागवड करणे शेतकऱ्यांना परवडणारे नाही.

Advertisement
Tags :

.