For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इस्रालयच्या हल्ल्यात 500 जण ठार

06:41 AM Sep 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
इस्रालयच्या हल्ल्यात 500 जण ठार
Advertisement

सलग चार दिवस लेबेनॉनवर जोरदार बाँबवर्षाव, हिजबुल्लाला खिळखिळे करण्याचा निर्धार

Advertisement

जेरुसलेम / वृत्तसंस्था

इस्रालयने गेले चार दिवस दक्षिण लेबेनॉनमधील हिजबुल्लाच्या स्थानांवर चालविलेल्या जोरदार बाँबवर्षावात आतापर्यंत 500 हून अधिकांचा बळी गेला आहे. बळी गेलेल्यांमध्ये हिजबुल्लाचे काही महत्त्वाचे म्होरके, या दहशतवादी संघटनेचे अनेक हस्तक आणि काही सामान्य नागरिक प्राणास मुकले आहेत. या दशकातील हा इस्रायलचा सर्वात भीषण हल्ला आहे, असे प्रतिपादन करण्यात आले. रविवार आणि सोमवार या दोन दिवसांमध्ये मिळून 300 हून अधिक जणांना यमसदनी धाडण्यात आले आहे. हिजबुल्लाला विकलांग करून सोडण्याचा निर्धार इस्रायलने केला असून त्या दिशेने ही कार्यवाही केली जात आहे.

Advertisement

इस्रायलच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांचीही संख्या 1000 हून अधिक आहे. दक्षिण लेबेनॉनमधील लाखो नागरिकांनी सुरक्षितस्थळी पलायन करण्याची धडपड चालविली आहे. या भागातील दोन शहरे ओस पडली असून खेड्यांमधूनही मोठ्या प्रमाणात स्थलांतरे होत आहेत. या भागातील संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसत असून गाझा पट्टीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.

 

नेतान्याहू यांचे आवाहन

हिजबुल्लाचे दहशतवादी आपल्याच नागरिकांचा उपयोग ढाल म्हणून करत असून सामान्य लोकांचा जीव धोक्यात घालत आहेत. त्यामुळे दहशतवाद्यांचा हा कावा ओळखून लेबेनॉन येथील सर्वसामान्य नागरिकांनी हिजबुल्लाची प्रभावक्षेत्रे सोडावीत आणि सुरक्षितस्थळी निघून जावे. दहशतवाद्यांच्या कारस्थानांना त्यांनी बळी पडू नये, असे कळकळीचे आवाहन इस्रायलचे नेते बेंजामिन नेतान्याहू यांनी केले आहे. लेबेनॉनच्या नागरिकांना एसएमएसद्वारेही हा संदेश पाठविण्यात आला असून असे 80 हजारांहून अधिक संदेश मिळल्याची माहिती देण्यात आली.

हिजबुल्लाचाही प्रतिहल्ला

इस्रायलच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न हिजबुल्लाने केला असून उत्तर इस्रायलमधील इस्रालयी वायुसेनेच्या विमान तळांवर 200 अग्निबाणांचा मारा या संघटनेकडून करण्यात आला. सोमवारी आणि मंगळवारी झालेल्या हल्ल्यात इस्रायलच्या काही इमारतींना आग लागली होती. तथापि, इस्रायलची कोणतीही जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही. त्यामुळे हिजबुल्लाच्या हल्ल्याचा उद्देश सफल झाल्याचे दिसत नाही, असे बोलले जात आहे. तसेच इस्रायलने सातत्याने हिजबुल्लाच्या तळांवर हल्ले चढविल्याने या संघटनेचे शस्त्रबळही क्षीण झाले आहे. त्यामुळे त्यांचा प्रतिहल्लाही कमजोर पडत आहे, असे आंतरराष्ट्रीय तज्ञांचे मत आहे.

लेबेनॉनकडून छावण्यांची स्थापना

जखमी दहशतवादी आणि नागरिकांना आश्रय देण्यासाठी लेबेनॉन प्रशासनाने 89 साहाय्यता छावण्या उभ्या केल्या आहेत. या छावण्या शाळा आणि इतर इमारतींमध्ये स्थापन करण्यात आल्या आहेत. या छावण्यांमध्ये 26 हजार लोकांची सोय होऊ शकते. इस्रायलच्या हल्ल्यांनंतर पलायन केलेल्या नागरिकांसाठी त्या असल्याचे स्पष्ट करण्यात आले. येथे नागरिकांना अन्न-पाणी देण्यात येते.

इस्रालयकडून पुरावा सादर

हिजबुल्लाचे दहशतवादी आपल्याच सर्वसामान्य नागरिकांचा उपयोग कसा ढालीसारखा करीत आहेत, याचे व्हिडीओ चित्रण इस्रायलने मंगळवारी प्रसारित केले. हिजबुल्लाकडून नागरिकांसाठीच्या इमारतींचा उपयोग शस्त्र अग्नीबाणांचा साठा करण्यासाठी कसा केला जात आहे, हे सुद्धा इस्रायलने दाखवून दिले. दहशतवाद्यांच्या स्थानांपासून दूर जा, हा इस्रालयचा संदेश मात्र सर्वसामान्य नागरिकांनी गांभीर्याने घेतला असून त्यांनी आश्रयस्थानांकडे धाव घेतली आहे. इस्रायलचे हे व्हिडीओ सोशल मिडियावर असंख्यांनी पाहिले आहेत.

Advertisement
Tags :

.