अरबी समुद्रात 500 किलो ड्रग्ज जप्त
भारत-श्रीलंकेन नौदलाची मोठी संयुक्त कारवाई
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय नौदलाने श्रीलंकेच्या नौदलासोबत संयुक्त कारवाई करत अरबी समुद्रातून 500 किलो ड्रग्ज जप्त केले आहे. क्रिस्टल मेथ नामक ड्रग्ज दोन बोटीतून जप्त करण्यात आल्याची माहिती शुक्रवारी देण्यात आली. जप्त केलेल्या दोन्ही बोटी, जहाजावरील तस्कर आणि अमली पदार्थांचा साठा श्रीलंका सरकारकडे सोपवण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे.
श्रीलंकन नौदलाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे भारतीय नौदलाच्या लांब पल्ल्याच्या सागरी गस्ती विमान आणि ड्रोनद्वारे अरबी समुद्रात दोन बोटी रोखण्यात आल्या. या बोटींची झडती घेतल्यानंतर त्यातून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात आल्याचे भारतीय नौदलाने शुक्रवारी सांगितले. दोन्ही बोटी, चालक दल आणि जप्त केलेले अमली पदार्थ पुढील कायदेशीर कारवाईसाठी श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आले आहेत. श्रीलंकेच्या नौदलासोबतच्या संयुक्त मोहिमेवर भारतीय नौदलाने भाष्य केले आहे. ही कारवाई दोन्ही देश आणि नौदल यांच्यातील सखोल वाढत्या भागिदारी आणि संबंधांची पुष्टी करते. हे प्रादेशिक सागरी आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि हिंदी महासागर क्षेत्रातील सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी दोन्ही नौदलाच्या संयुक्त संकल्पाचे प्रतीक आहे.
अलिकडेच भारतीय तटरक्षक दलाने 5,500 किलो मेथॅम्फेटामाईन ड्रग्ज जप्त केले होते. ही जप्ती अंदमान आणि निकोबार सागरी क्षेत्रात करण्यात आली होती. अंदमान आणि निकोबारमधील बॅरेन बेटावर तटरक्षक दलाच्या पायलटला नियमित निरीक्षणादरम्यान एक संशयास्पद बोट दिसली. इशाऱ्यानंतरही कर्मचाऱ्यांनी बोट पुढे दामटण्याचा प्रयत्न केला असता तटरक्षक दलाने कारवाई करत बोट ताब्यात घेतली.
अलिकडच्या काळात देशात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. अमली पदार्थांची तस्करी केवळ देशाच्या सुरक्षेवरच नाही तर सार्वजनिक आरोग्य सुरक्षा, राजकीय स्थिरता आणि आर्थिक विकासावरही गंभीर परिणाम करते.