अमेरिकेत 500 घुसखोरांना अटक
शेकडो बेकायदा स्थलांतरितांची मायदेशी पाठवणी
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी
अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तासूत्रे हाती घेतल्यानंतर त्वरित आपल्या आदेशांचे कार्यान्वयन करण्यास प्रारंभ केला आहे. अमेरिकेत होणारी बेकायदा घुसखोरी सहन केली जाणार नाही, हे त्यांनी आधीच स्पष्ट केले होते. सोमवारी शपथग्रहण केल्यानंतर त्यांनी बेकायदा घुसखोरीच्या विरोधात प्रशासकीय आदेश काढला आहे. हा आदेश लागू करण्यात आला असून शुक्रवारी त्या देशात 500 हून अधिक गुन्हेगार घुसखोरांना अटक करण्यात आली.
त्याचप्रमाणे शेकडोंच्या संख्येने बेकायदा स्थलांतरितांची त्यांच्या देशांमध्ये पाठवणीही करण्यात आली आहे. गेल्या चार वर्षांमध्ये अमेरिकेत येणाऱ्या बेकायदा लोकांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. इतक्या उपऱ्या लोकांना पोसण्याची अमेरिकेची क्षमता नाही, अशी ट्रम्प यांची भूमिका आहे. त्यामुळे अशा बेकायदा लोकांनी किंवा ज्यांच्याजवळ स्थलांतराचे कोणतेही वैध कागदपत्र नाहीत, त्यांनी अमेरिका सोडून जावे. अन्यथा त्यांना बाहेर काढण्यात येईल, असा इशारा ट्रम्प यांनी दिला होता. आता त्यांच्या आदेशावर धडक कारवाई केली जात आहे.
अमेरिकेच्या सुरक्षेला धोका
अमेरिकेत बेकायदा प्रवेश करणाऱ्यांमध्ये अनेक समाजकंटकांचा, दहशतवाद्यांचा आणि गुन्हेगारांचाही समावेश आहे. या लोकांच्या अमेरिकेच्या सुरक्षेला मोठा धोका असून अमेरिका तो पत्करु शकत नाही. केवळ मानवाधिकारांच्या नावाखाली असे मवाळ धोरण स्वीकारल्यास अमेरिकेचेच भवितव्य धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही, अशी ट्रम्प यांची रास्त भूमिका आहे. त्यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात ते या दिशेने आणखी मोठी कारवाई करतील अशी शक्यता व्यक्त केली जाते.
किती घुसखोर
काही सर्वेक्षण संस्थांच्या मते अमेरिकेत तिच्या लोकसंख्येच्या किमान पाच टक्के इतक्या प्रमाणात बेकायदा घुसखोर शिरले आहेत. अमेरिकेची लोकसंख्या 34 कोटीहून अधिक आहे. या लोकसंख्येत किमान दीड कोटी लोक हे बेकायदा घुसलेले आहेत, अशी माहिती दिली जाते. काही संस्थांच्या मते ही संख्या 50 ते 75 लाख इतकी आहे. या बेकायदा प्रवेश केलेल्या लोकांची नेमकी संख्या कोणालाही निश्चितपणे माहीत नाही. एकदा अमेरिकेत आल्यानंतर हे लोक विविध प्रांतांमध्ये प्रवेश करतात आणि नंतर काम मिळवितात. ते कमी वेतनात काम करण्यास तयार असल्याने त्यांना नोकऱ्या किंवा रोजगारही त्वरित उपलब्ध होतात. यामुळे अमेरिकेचे नागरिक असणाऱ्या लोकांचे रोजगार हिसकावले जातात, अशी तक्रार केली जाते. ट्रम्प यांनी या तक्रारीची गंभीर नोंद घेतल्याचे दिसून येते.