बेंगळूर नगरपालिकांसाठी 50 टक्के महिलांना तिकिटे
उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची माहिती
बेंगळूर : ग्रेटर बेंगळूर प्राधिकरणाच्या (जीबीए) अंतर्गत येणाऱ्या पाच नगरपालिकांच्या निवडणुकीत 50 टक्के तिकिटे महिलांना दिली जातील. त्यामुळे येत्या काळात बेंगळूरमधील पालिकांमध्ये निम्म्या संख्येने महिला नगरसेवक असतील, असे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी सांगितले. ग्रेटर बेंगळूर प्राधिकरण आणि बेंगळूर राजकीय कृती समितीने (बी.पीएसी) बेंगळूरच्या माऊंट कार्मेल कॉलेजच्या सहकार्याने बुधवारी ‘बेंगळूर विकास आणि परिवर्तन’ या विषयावर संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना जीबीए सुरू करण्याची ही योग्य वेळ आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला, त्यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, बेंगळूर शहर अनेक दशकांपासून विविध आव्हानांना तोंड देत आहे. आपण सर्वजण बेंगळूरचे रहिवासी आहोत. कोणत्याही राज्यासाठी किंवा शहरासाठी शहरीकरण हे एक मोठे आव्हान असते.
शिक्षण, नोकरी आणि चांगल्या जीवनासाठी लोक बेंगळूरमध्ये स्थलांतर करतात. कोणत्याही शहराची लोकसंख्या वाढली की समस्या वाढतात. प्रभावी प्रशासन, प्रभावी सेवा व समन्वय साधण्याच्या उद्देशाने जीबीए अस्तित्वात आणण्यात आले आहे. जोपर्यंत नागरिक व अधिकारी एकमेकांच्या सहकार्याने काम करत नाहीत, तोपर्यंत बेंगळूरची प्रगती शक्य नाही, असे ते म्हणाले. बेंगळूर 198 वॉर्ड असलेले मोठे शहर होते. सर्व वॉर्ड व्यवस्थापित करण्यासाठी एकच आयुक्त होता. एका व्यक्तीसाठी इतके व्यवस्थापन सांभाळणे कठीण आहे. पुढील 10-15 वर्षांत बेंगळूरची लोकसंख्या 2 कोटींपर्यंत पोहोचेल. वाहतूक व इतर समस्यांना तोंड देण्यासाठी आधी बेंगळूर महानगरपालिकेचे विभाजन केले आणि चांगले प्रशासन देण्यासाठी पाच नगरपालिका निर्माण केल्या आहेत. येथे 368 वॉर्डांची रचना करण्यात आली आहे. स्वच्छता आणि वाहतूक सुधारण्यासाठी अनेक पावले उचलण्यात आली आहेत, असेही शिवकुमार यांनी सांगितले.