शहरात 50 टक्के जलवाहिनीचे काम पूर्ण
24 तास पाणीपुरवठ्याच्या कामाला वेग : अद्यापही 50 कि. मी. जलवाहिनी घालण्याचे उद्दिष्ट
बेळगाव : शहरात 24 तास पाणीपुरवठ्यासाठी जलवाहिनी घालण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. शहरांतर्गत सर्व गल्ल्यांमध्ये या कामाला गती निर्माण झाली आहे. 2026 पर्यंत शहराला 24 तास पाणीपुरवठ्याचे उद्दिष्ट एलअॅण्डटीने ठेवले आहे. यासाठी शहरात 95 किलोमीटर जलवाहिनी घातली जाणार आहे. मात्र, आतापर्यंत केवळ 45 किलोमीटर जलवाहिनी घालण्याचे काम पूर्ण झाले आहे. अद्याप 50 टक्के जलवाहिनी घालण्याचे काम शिल्लक आहे. शहरातील 58 प्रभागांमध्ये 24 तास पाण्यासाठी जलवाहिनी घातली जाणार आहे. मात्र, मध्यंतरी हे काम संथगतीने सुरू होते. त्यामुळे आतापर्यंत शहरातील 16 हजार घरांना नळजोडणीचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित घरांनाही नळजोडणी करावी लागणार आहे. तत्पूर्वी जलवाहिनी घालण्याचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्टही एलअॅण्डटीसमोर आहे.
राकसकोप आणि हिडकल जलाशयातून शहराला पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र, हिडकल जलाशयाच्या पाणीपातळीत घट झाली आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर बनण्याची चिन्हे आहेत. हिडकल जलाशयावर बेळगावसह, हुक्केरी, संकेश्वर शहराचा भार आहे. शिवाय अलीकडे पाण्याच्या मागणीत वाढ झाल्याने पाण्याची टंचाई निर्माण होऊ लागली आहे. एलअॅण्डटीकडून शहरातील वर्दळीच्या ठिकाणीच जलवाहिनीचे काम हाती घेण्यात आले आहे. काकतीवेस, शनिवार खूट, रिसालदार गल्लीत जेसीबीच्या साहाय्याने खोदाई केली जात आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ लागला आहे. त्याचबरोबर यापूर्वी तयार करण्यात आलेल्या काँक्रिटच्या रस्त्याची वाट लागत आहे. शिवाय या कामामुळे काही ठिकाणी जलवाहिनींना गळती लागून पाणीपुरवठ्यात व्यत्यय निर्माण होण्याचे प्रकारही घडू लागले आहेत.