भाजप समर्थक पॅनलमध्ये 50 टक्के नव्या चेहऱ्यांना संधी
मंत्री बाबुश मोन्सेरात यांची माहिती
पणजी : महापौर रोहित मोन्सेरात, उदय मडकईकर, संजीव नाईक यांचे प्रभाग राखीव झाल्यानंतर भाजप समर्थक पॅनलचे 50 टक्के उमेदवार हे नवखे असतील. नव्या चेहऱ्यांना जास्तीत जास्त संधी दिली जाईल, अशी माहिती पणजीचे आमदार तथा महसूलमंत्री बाबुश मोन्सेरात यांनी दिली. आगामी पणजी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री मोन्सेरात म्हणाले, या वेळेस युवकांना संधी देण्याचा विचार चालवला आहे. पणजी महापालिका निवडणुकीची तारीख जाहीर झाली नसली तरी निवडणूक मार्च महिन्यात होईल. प्रभाग रचनेबरोबरच राखीवतेची अधिसूचनाही जाहीर झाल्यानंतर इच्छुकांकडून तयारीला वेग आला आहे. सुरेंद्र फुर्तादो, जॉएल आंद्राद, उदय मडकईकर यांच्यासह सध्याच्या नगरसेवकांचे प्रभाग राखीवतेमुळे यावेळेस चित्र बदलणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजप समर्थक पॅनलमधील आपले सर्व उमेदवार जिंकून येतील, अशा विश्वासही मोन्सेरात यांनी व्यक्त केला.