‘माझी बस’मध्ये महिलांना 50 टक्के सवलत
खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना मिळणार योजनेचा लाभ : मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची घोषणा: सांखळीत योजनेचा पुन:शुभारंभ
प्रतिनिधी / साखळी
‘माझी बस’ ही प्रत्येक बसमालकांसह लोकांनाही आपलीच वाटावी यासाठी ही योजना असून गोव्याच्या वाहतूक क्षेत्रात नवीन क्रांती आणण्यासाठी उचललेले पाऊल आहे. या योजनेचा लाभ बसमालकांना मोठ्या प्रमाणात होणार असून ग्रामीण भागातील लोकांना विशेषत: महिलांना सुरक्षित वाहतूक मिळावी हा उद्देश समोर ठेवण्यात आलेला आहे. गोव्यात खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या युवती, महिलांना या योजनेमार्फत प्रवासात 50 टक्के तिकीटामध्ये सवलत देण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांखळी येथे ‘माझी बस’ या सुधारित योजनेच्या पुन: शुभारंभ प्रसंगी बोलताना केली.
त्याचप्रमाणे गेल्या दोन वर्षांपासून या योजनेंतर्गत बसमालकांचे थकलेल्या पैशातील 50 टक्के आता तर 50 टक्के दोन महिन्यांत देण्यात येणार असल्याचेही जाहीर करून बसमालकांना रुपये 1 लाखापैकी रुपये 50 हजाराची मंजुरीपत्रे वितरित करण्यात आली. तसेच बसमालकांना स्वाईप मशीनेही वितरित करण्यात आली.
सांखळी रवींद्र भवनात आयोजित ‘माझी बस योजने’च्या पुन:शुभारंभप्रसंगी व्यासपीठावर वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो, कदंब महामंडळाचे अध्यक्ष आमदार उल्हास तुयेकर, महामंडळाचे संचालक प्रवीणमल अभिषेक, व्यवस्थापकीय संचालक रोहन कासकर, डिचोली आरटीओ सहाय्यक वाहतूक संचालक संजय पारोडकर, जिल्हा पंचायत सदस्य गोपाळ सुर्लकर, वाहतूक संचालक अनिल सावंत व इतरांची उपस्थिती होती.
बसमालकांना जादा नफा
आपणास जास्त प्रवासी हवे म्हणून भरधाव बस चालवून ओव्हरटेक करण्याची गरज नाही. या ‘माझी बस’च्या दोन बसमध्ये कदंब बस असल्यास ती आपण काढणार. परंतु खासगी बसवाल्यांनी नियमित रूटवर बसेस चालवाव्यात. सरकार कार्ड व्यवस्था तयार करीत आहे. एक हजाराचे कार्ड घेतल्यावर ते कोणत्याही बसला चालणार. तिकिटचे पैसे कार्डद्वारे जाणार, ते दररोज बसमालकांच्या बँक खात्यावर येणार आहे.
विद्यार्थ्यांना अर्ध्या तिकीटचे पैसेही बसवाल्यांच्या बँक खात्यावर येणार आहेत. आठ दिवसांनी पैसे खात्यावर येणार. त्यांना अर्धे तिकिट म्हणून नाकारू नये. कदंब बससाठी जे महामंडळ पास देते, ते पासही या बसमध्ये चालणार. त्यामुळे प्रवासी वाढणार व जादा नफा बसमालकांना होणार आहे.
महिन्याला किती पैसे मिळतात ते लेखी द्या, या योजनेत आल्यानंतर एका बसमालकाला 1 लाख 20 हजाराचा रिपोर्ट मिळणार, त्यात सरकार अतिरिक्त 20 हजार देणार आहे. ट्रेकिंग डिव्हायसमार्फत एका मोबाईल अॅपवर सामान्य लोकांना बसचे ट्रेकिंग मिळणार असून प्रवास सोपा होईल. जेणेकरून रस्त्यावर खासगी वाहने फिरणे कमी होणार व अपघातांचे प्रमाणही घटणार आहे. ग्रामीण भागातील बसमालकांना जास्त प्रमाणात तोटा सहन करावा लागतो. त्यासाठी त्यांनी सर्वप्रथम या ‘माझी बस’ योजनेत नोंद करून घ्यावे. ही योजना चांगल्या पद्धतीने तयार केली असून वार्षिक बसवाल्याला अडीच लाखांपेक्षा जास्त नफा मिळणार आहे.
आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारा : मंत्री गुदिन्हो
यावेळी वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी म्हटले की, आज सर्वच क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. ते तंत्रज्ञान स्वीकारायला हवे, डिजिटल अॅप आणण्याच्या प्रयत्नात सरकार असून लोकांना जलद व सुरळीत सेवा मिळायला हवी. यासाठी गोव्यात अनेक कायदे बदलले. तर हे बदल बसप्रवास, टॅक्सीमध्ये का करू नये ? यातून कोण कोणाचा व्यवसाय नेत नाही उलट धंदा वाढणार, नफाही वाढणार. याचा लाभ लोकांबरोबरच टॅक्सीवाल्यांनाही होणार आहे. टॅक्सींना मीटर बसविण्याची सक्ती हा न्यायालयाचा आदेश होता व तो आपण मंत्री होण्यापूर्वीच झाला होता. त्यामुळे या आदेशाचे पालन करणे बंधनकारक होते. हे मीटर बसविण्यासाठी होणारा खर्च तसेच होणारा त्रास जर टॅक्सीवाले अॅपच्याखाली आल्यास त्याचक्षणी बंद होणार आहे. या अॅप व्यवस्थेत जादा धंदा व लाभ होणार याचा विचार टॅक्सीवाल्यांनी करायला हवा. आपण सर्वांचे ऐकायला व सल्लेही घेण्यास तयार आहे. पण प्रत्येकाने नवीन तंत्रज्ञान स्वीकारण्यास व त्याप्रमाणे पुढे जाण्याची तयारी ठेवावी, असे ते म्हणाले.
बसमालकांनी उद्धार करून घ्यावा : तुयेकर
यावेळी कदंब महामंडळाचे अध्यक्ष उल्हास तुयेकर म्हणाले की, ‘माझी बस’ ही योजना गोव्यातील वाहतूक व्यवस्था सुधारताना बसमालकांचेही हित जपणारी आहे. या योजनेकडे बसमालकांनी वेगळ्या विचाराने न पाहता एक लाभदायक योजना म्हणून पहावे व आपला उद्धार करून घ्यावा. बस मालक संघटनेचे अध्यक्ष सुदीप ताम्हणकर, संचालक प्रवीणमल अभिषेक यांनीही यावेळी विचार मांडले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दीपप्रज्वलाने कार्यक्रमाची सुऊवात झाली.
गोवा पहिल्या क्रमांकाचे राज्य ठरणार
‘माझी बस’ या योजनेत सरासरी दिवसाला 200 किमी बस चालल्यास बसमालकाला महिन्याला 20 हजार जास्त मिळणार आहे. सरासरी महिन्याला 2 लाख 20 हजार रु. अधिक मिळू शकेल. गेल्यावेळी आणलेल्या ‘माझी बस’ योजनेतून 56 लोकांना दीड वर्षांसाठी सरकारने 12 कोटी खर्च केले. प्रथम आलेल्यांना 50 लाख ते एक कोटी रु. दीड वर्षात मिळाले. आताच्या सुधारित योजनेत जितक्या लवकर नोंद होणार तेवढाच लवकर लाभ मिळणार. या योजनेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बस सेवेत डिजिटायझेशन आणणारे गोवा सरकार हे गोव्यात पहिल्या क्रमांकाचे राज्य ठरणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.