बनावट सोने तारण ठेवून 50 लाखांची फसवणूक
व्यावसायिकाला घातला गंडा
बेळगाव : बनावट सोने तारण ठेवून एका व्यावसायिकाची तब्बल 50 लाख 20 हजार रुपयांना फसवणूक करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी विक्रम विनयकुमार रेवणकर (वय 35) रा. वझे गल्ली वडगाव यांनी शहापूर पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी प्रताप आगरवाल रा. नाझर कॅम्प, वडगाव, अभिषेक कलघटगी रा. शास्त्रीनगर शहापूर, अनिकेत सरकार उर्फ नितीन पाटील, सागर कलघटगी दोघेही रा. कोल्हापूर यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून घेत तपास चालविला आहे.
याबाबत पोलिसांतून समजलेली अधिक माहिती अशी की, फिर्यादी विक्रम रेवणकर हे नाथ पै सर्कल शहापूर येथे व्यंकटेश्वर पान्स नावाने अधिकृतरित्या खासगी सावकारीचे व्यवहार करतात. काही दिवसांपूर्वीच वरील संशयित व त्यांच्या परिचयातील काहींनी खरे सोने आहे असे सांगून 935.9 ग्रॅम वजनाचे बनावट दागिने त्यांच्याकडे गहाण ठेवले व त्याच्या मोबदल्यात 50 लाख 20 हजार रुपयांची रक्कम उचलली.
कर्जाची रक्कम परतफेड करण्याकडे दुर्लक्ष करण्यासह गहाण ठेवण्यात आलेल्या जुन्या दागिन्यासारखेच अन्य दागिनेही ते वारंवार गहाण ठेवण्यासाठी येत होते. इतकेच नव्हे तर त्या दागिन्यांची बनावट बिले व त्यावरील शिक्केही बनावट होते. या सर्व प्रकाराबाबत रेवणकर यांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. गहाण ठेवलेल्या दागिन्यांची पडताळणी केली असता त्यावर होलमार्कही नव्हता. त्यामुळे मशिनमध्ये दागिने तपासून पाहिले असता ते सोने नसून बनावट असल्याचे स्पष्ट झाले.
आतमध्ये तांबे आणि चांदीचा भाग होता तर वरच्या भागावर बनावट सोन्याचे आवरण होते. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर विक्रम रेवणकर यांनी शहापूर पोलीस स्थानक गाठून घडलेली हकीकत सांगितली. बनावट सोने गहाण ठेवून 50 लाखाहून अधिक रक्कम उचलण्यात आल्याने पोलिसांना देखील धक्काच बसला. या प्रकरणी वरील चौघांविरोधात 10 ऑक्टोबर रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून घेण्यात आला असला तरी याबाबत पोलिसांनी अत्यंत गोपनियता बाळगली आहे. पोलीस निरीक्षक डी. संतोषकुमार हे पुढील तपास करीत आहेत.