चिवला बीच रस्ता दुरुस्ती कामाचा शुभारंभ
मालवण : पर्यटक आणि स्थानिक नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या चिवला बीच येथील निलरत्न बंगला ते कुरणपर्यंतच्या अस्तित्वातील रस्त्याच्या दुरुस्ती कामाचा शुभारंभ आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना तसेच महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत जिल्हास्तरावरून सन २०२५-२६ साठी सुमारे ५० लाख रुपयांचा निधी या रस्ता दुरुस्ती कामासाठी मंजूर करण्यात आला आहे. रस्त्याच्या दुरुस्तीमुळे चिवला बीच परिसरातील स्थानिक नागरिकांसह पर्यटक आणि पर्यटन व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या कामासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल नगराध्यक्षा ममता वराडकर आणि स्थानिक नागरिकांनी आमदार निलेश राणे यांच्यासह खासदार नारायण राणे व पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार मानले.
पथदीपांसाठीही १० लाखांचा निधी
चिवला बीच परिसरातील मार्गांवर बसवण्यात आलेले आकर्षक पथदीप अनेक ठिकाणी बंद अवस्थेत आहेत. हे पथदीप दुरुस्त करून पुन्हा कार्यान्वित करण्यात येणार असून, त्यामुळे संपूर्ण परिसर रात्रीच्या वेळी अधिक प्रकाशमान होणार आहे. यासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत सुमारे १० लाख रुपयांचा निधी आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून मंजूर झाल्याची माहिती नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी दिली.
नागरिकांकडून आभार
चिवला बीच परिसरातील हा महत्त्वाचा रस्ता गेल्या काही काळापासून नादुरुस्त अवस्थेत होता. पर्यटकांची वाढती वर्दळ तसेच स्थानिक नागरिकांची गरज लक्षात घेऊन रस्ता दुरुस्तीचे काम प्राधान्याने मंजूर करून निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल स्थानिक नागरिक आणि पर्यटन व्यावसायिकांच्या वतीने प्रसन्न मयेकर यांनी आमदार निलेश राणे आणि नगराध्यक्षा ममता वराडकर यांचे आभार मानले.
जुन्या आठवणींना उजाळा
चिवला बीचच्या पर्यटन विकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या बंधाऱ्याच्या मंजुरीच्या जुन्या आठवणींनाही या भूमिपूजनाच्या निमित्ताने उजाळा मिळाला. माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी २०१२ मध्ये या बंधाऱ्याला मंजुरी दिली होती. त्यावेळी झालेल्या भूमिपूजन सोहळ्यात तत्कालीन नगरसेविका ममता वराडकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले होते.
आता चिवला बीच येथील रस्ता दुरुस्तीच्या कामाचे भूमिपूजन होत असताना आमदार निलेश राणे यांनी पुन्हा एकदा श्रीफळ वाढवण्याचा मान नगराध्यक्षा ममता वराडकर यांना दिला. त्यामुळे या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, नगराध्यक्षा ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, जिल्हा परिषद वित्त व बांधकाम सभापती संतोष साटविलकर, व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर, नगरसेविका शर्वरी पाटकर, अश्विनी कांदळकर, दर्शना कासवकर, नगरसेवक महेश कांदळगांवकर, सिद्धार्थ जाधव, ललित चव्हाण, शिवसेना पदाधिकारी मंदार लुडबे, बबन शिंदे, विश्वास गावकर, किसन मांजरेकर, मोहन वराडकर, जॉन नरोना, परशुराम पाटकर, निकीत वराडकर, प्रसन्न मयेकर यांच्यासह स्थानिक नागरिक व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.