एका ‘चार्ज’मध्ये 50 किलोमीटर...
सध्या वीजेवर चालणाऱ्या वाहनांचा जोरदार बोलबाला आहे. या वाहनांमुळे प्रदूषणाला जवळपास फाटा मिळतो. तसेच ‘मायलेज’च्या दृष्टीनेही ती अतिशय लाभदायक असतात, असा अनुभव अनेकांना आलेला आहे. आता दुचाकी वाहनांमध्येही वीजेवर चालणाऱ्या वाहनांचा खप वाढू लागला आहे, असे दिसते.
मात्र, या वाहनांसंबंधीची एक अडचण अशी की त्यांची किंमत पेट्रोल किंवा डिझेलच्या वाहनांपेक्षा बरीच अधिक असते. त्यामुळे ती सर्वसामान्यांना परवडत नाहीत, अशी तक्रार असते. स्वस्तातील वीज वाहने घेतली तर चढणीवर चालू शकत नाहीत, असेही बोलले जाते. तथापि, या अडचणींवर मात करणारा एक ‘जुगाड’ बिहार राज्यातील भोजपूर येथील एका वेल्डिंग मेस्त्रीने करुन दाखविला आहे. त्याचे नाव संतोष शर्मा असे आहे. त्याने वीजेवर चालणारी एक सायकल निर्माण केली असून ती बाजारात सध्या उपलब्ध असणाऱ्या अशा प्रकारच्या सायकलींपेक्षा सोयीची आणि स्वस्त आहे, असे शर्मा यांचे प्रतिपादन आहे.
एका चार्जमध्ये ही सायकल 50 किलोमीटरचे अंतर पार करु शकते. ती बॅटरीवर तर चालतेच पण पॅडल मारुनही चालविता येते. सहा महिन्यांच्या प्रयत्नांनंतर ही सायकल बनविण्यात शर्मा यांना यश आले आहे. तिचा निर्मितीखर्च अवघा 22 हजार रुपये आहे. बॅटरी आणि चार्जरसह ही सायकल 35 हजार रुपयांपर्यंत खरेदी करता येऊ शकेल, अशी स्थिती आहे. सध्या बाजारात अशा प्रकारच्या सायकलींची किंमत 50 हजार ते 60 हजार रुपये किमान आहे. या सायकलींचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्याची शर्मा यांची योजना आहे.