दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानात 50 ठार
प्रवासी वाहनांवर अंदाधुंद गोळीबार : परिसरात हाहाकार
वृत्तसंस्था/पेशावर
सलग दुसऱ्या दिवशी पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वामध्ये भीषण दहशतवादी हल्ल्याची घटना समोर आली आहे. या दहशतवादी हल्ल्यात 50 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. खैबर पख्तुनख्वामधील डाऊन कुर्रम भागात प्रवासी वाहनांवर हा हल्ला झाला. या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी गटाने स्वीकारलेली नाही. तसेच यामागे कोणाचा हात आहे याची माहितीही पाकिस्तानी लष्कराने दिलेली नाही.
अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या वायव्य पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वामधील लोअर कुर्रममध्ये मोठा हल्ला झाल्याची माहिती देण्यात आली. ओचुत काली आणि मंडुरी जवळून प्रवासी वाहने जात असताना तेथे आधीच घुसलेल्या दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. ही प्रवासी वाहने पाराचिनारहून पेशावरला जात होती. प्रवासी बसपाठोपाठ येणाऱ्या अन्य वाहनांवरही दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला. अंदाधुंद गोळीबारामुळे परिसरात हाहाकार माजला असून अनेक लोक बचावासाठी आकांत करत असल्याचे विदारक दृष्य निर्माण झाले होते.
तालिबानचे वर्चस्व असलेल्या भागातील घटना
हल्ल्यात आठ महिला आणि पाच मुलांसह 50 जण मृत झाले आहेत. त्याशिवाय एका पोलीस अधिकाऱ्यासह 20 हून लोक जखमीही झाले आहेत. तालिबानचे वर्चस्व असलेल्या भागात वाहनांवर हल्ला करण्यात आला, असे एका स्थानिक पत्रकाराने सांगितले. स्थानिक मीडियानुसार, ताफ्यात 200 हून अधिक वाहने होती. हल्ल्यात जखमी झालेल्या लोकांना विविध इस्पितळांमध्ये दाखल करण्यात आले आहे. अलिझाई येथील टीएचक्मयू ऊग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार काही जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना जिह्यातील विविध ऊग्णालयात आणि काहींना उपचारासाठी पेशावरला पाठवण्यात आले आहे.
राष्ट्रपती, मुख्यमंत्र्यांकडून घटनेचा निषेध
पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. ‘निरपराध प्रवाशांवर हल्ला करणे भ्याड आणि अमानुष आहे. या घटनेला जबाबदार असणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे. जखमींना वेळेवर वैद्यकीय मदत पुरविली जाईल’ असे त्यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे. खैबर पख्तुनख्वाचे मुख्यमंत्री अली अमीन खान गंडापूर यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत प्रांतीय कायदा मंत्री, प्रदेशातील खासदार आणि मुख्य सचिव यांचा समावेश असलेल्या शिष्टमंडळाला परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि अहवाल सादर करण्यासाठी कुर्रमला तातडीने भेट देण्याचे निर्देश दिले. सदर प्रांतातील सर्व रस्ते सुरक्षित करण्यासाठी प्रांतीय महामार्ग पोलीस युनिट स्थापन करण्यावर काम करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
गुरुवारी झालेल्या गोळीबाराच्या घटनेपूर्वी बुधवारीही पाकिस्तानच्या उत्तर-पश्चिम खैबर पख्तुनख्वा प्रांतातील एका संयुक्त चेकपोस्टवर एका आत्मघाती बॉम्बरने स्फोटकांनी भरलेले वाहन घुसवत हल्ला केला होता. या हल्ल्यात 17 सुरक्षा जवान ठार झाले होते. तसेच या हल्ल्यानंतर झालेल्या चकमकीत सहा दहशतवाद्यांनाही कंठस्नान घालण्यात आले होते.