बाजारपेठेत 50 किलो फटाके जप्त
केवळ ग्रीन फटाक्यांनाच परवानगी
बेळगाव : दिवाळीत प्रदूषणकारक ठरणारे फटाके फोडण्यावर सरकारने बंदी घातली आहे. केवळ ग्रीन फटाक्यांना परवानगी आहे. या पार्श्वभूमीवर मनपाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी रात्री वेगवेगळ्या फटाके दुकानांना भेटी देऊन तपासणी केली. प्रदूषणकारक फटाके अधिकाऱ्यांनी जप्त केले. मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. संजीव नांद्रे, महम्मद सादीक धारवाडकर, मल्लेश आदिवासी आदींचा समावेश असलेल्या पथकातील अधिकाऱ्यांनी बुधवारी रात्री बाजारपेठेतील फटाके दुकानांना भेटी देऊन तपासणी केली. ध्वनी प्रदूषण व वायू प्रदूषण टाळण्यासाठी सरकारने केवळ ग्रीन फटाक्यांना परवानगी दिली आहे. या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांनी तपासणी मोहीम हाती घेतली होती. राज्य सरकारने गेल्या बुधवारी 23 ऑक्टोबर रोजी फटाक्यांच्या वापरासंबंधी एक सूचना जारी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रदूषण वाढविणारे फटाके फोडण्यावर बंदी आहे. तपासणीवेळी काही दुकानांतून 50 किलोहून अधिक फटाके जप्त करण्यात आले. ग्रीन फटाके वगळता इतर फटाक्यांची विक्री करू नये, असे आवाहनही अधिकाऱ्यांनी केले आहे.