For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेळगाव-धारवाड रेल्वेमार्गासाठी 50 कोटीची तरतूद

11:15 AM Feb 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
बेळगाव धारवाड रेल्वेमार्गासाठी 50 कोटीची तरतूद
Advertisement

नैर्त्रुत्य रेल्वेच्या प्रकल्पांसाठी केंद्राकडून 7329 कोटीचा निधी

Advertisement

बेळगाव : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी संसदेत 2024 चा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये नैर्त्रुत्य रेल्वेसाठी 7329 कोटी रुपयांची भरीव तरतूद केली आहे. राज्यात नवीन रेल्वेमार्ग निर्मितीसोबतच दुपदरीकरणासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. तर बेळगाव-धारवाड व्हाया कित्तूर या रेल्वेमार्गासाठी 50 कोटी रुपयांची तरतूद केल्याने नैर्त्रुत्य रेल्वे विभागात रेल्वेच्या विकासकामांना गती मिळणार आहे. गुरुवारी सादर झालेल्या अर्थसंकल्पात बेळगाव परिसरातील रेल्वेमार्गांसाठी कोणती तरतूद होणार, याबाबत उत्सुकता होती. मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बेळगाव-धारवाड व्हाया कित्तूर रेल्वेमार्गासाठी अर्थमंत्र्यांनी तरतूद केली आहे. दोन वर्षांपूर्वीच्या अर्थसंकल्पातही पिंकबुकमध्ये या रेल्वेमार्गासाठीची तरतूद करण्यात आली होती. 50 टक्के खर्च राज्य सरकार तर 50 टक्के खर्च केंद्र सरकार करणार आहे. परंतु, शेतकऱ्यांनी भूसंपादनाला आक्षेप नोंदविल्यामुळे हा रेल्वेमार्ग रखडला आहे. परंतु, गुरुवारी या रेल्वेमार्गासाठी 50 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याने रेल्वेमार्ग होण्याची शक्यता आहे.

नैर्त्रुत्य रेल्वेला विकासकामांसाठी एकूण 7329 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये उभारण्यात येत असलेल्या नवीन प्रकल्पांचा समावेश आहे. बागलकोट-कुडची रेल्वेमार्गासाठी 410 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. याबरोबरच लोंढा-मिरज रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणासाठी 200 कोटी, होस्पेट-तिनईघाट-वास्को रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणासाठी 400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यात नैर्त्रुत्य रेल्वेची विकासात्मक एक्स्प्रेस गतीने धावणार आहे. सध्या असणारा बेळगाव-धारवाड रेल्वेमार्ग खानापूरच्या घनदाट जंगलातून जातो. यामुळे रेल्वेची गती वाढविण्यावर निर्बंध येत आहेत. त्याचबरोबर बेळगाव-धारवाड अंतरही दूर होत आहे. यासाठीच बेळगाव-धारवाड व्हाया कित्तूर असा 73 किलोमीटरचा रेल्वेमार्ग 2020-21 मध्ये रेल्वेमंत्रालयाने मंजूर केला आहे. या रेल्वेमार्गासाठी एकूण 927 कोटी रुपये खर्च येणार आहे. 2023-24 च्या अर्थसंकल्पामध्ये या रेल्वेमार्गासाठी 10 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. कर्नाटक इंडस्ट्रीयल एरिया डेव्हल्पमेंट बोर्ड (केआयडीबी) च्या माध्यमातून भूसंपादनाची प्रक्रिया बेळगाव व धारवाड जिल्ह्यांमध्ये राबविली जाणार आहे. या रेल्वेमार्गासाठी 888 एकर जागा संपादित केली जाणार आहे.

Advertisement

अर्थसंकल्पात रेल्वे प्रकल्पांसाठी केलेली तरतूद

  • प्रकल्प   तरतूद
  • बेळगाव-धारवाड नवीन रेल्वेमार्ग     50 कोटी
  • बागलकोट-कुडची नवीन रेल्वेमार्ग  410 कोटी
  • लेंढा-मिरज दुपदरीकरण   200 कोटी
  • होस्पेट-तिनईघाट-वास्को दुपदरीकरण         400 कोटी
Advertisement
Tags :

.