बळ्ळारी नाल्याच्या विकासासाठी 50 कोटींचा प्रस्ताव
नाल्याचे काँक्रिटीकरण होणार, पालकमंत्र्यांचा पुढाकार : सतीश जारकीहोळी यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन : शेतकऱ्यांतून समाधान
बेळगाव : गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या बळ्ळारी नाल्याच्या विकासासाठी 50 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्याचा प्रस्ताव सरकारला पाठविण्यात आला आहे. तसेच शनिवारी पार पडलेल्या बुडाच्या बैठकीत बळ्ळारी नाल्याचे काँक्रिटीकरण करण्याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याने रविवार दि. 19 रोजी शेतकऱ्यांनी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी रविवारी येळ्ळूर रोडवरील बळ्ळारी नाल्याला धावती भेट दिली. त्यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांनी पहिल्यांदा त्यांचे अभिनंदन करून आभार व्यक्त केले. गेल्या अनेक वर्षांपासून बळ्ळारी नाला विकासाच्या प्रतीक्षेत आहे. परिसरातील हजारो एकर जमिनीतील पिके दरवर्षी पुराच्या पाण्यात बुडत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे बळ्ळारी नाल्याचा प्रश्न मार्गी लावण्यात यावा, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करत आहेत. मात्र, दरवर्षी शेतकऱ्यांना केवळ आश्वासनच दिले जात होते. त्यामुळे यंदा समिती नेते रमाकांत कोंडुसकर यांनी पुढाकार घेत पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या निदर्शनास बळ्ळारी नाल्याचा प्रश्न आणून दिला.