आयटीआय कॉलेजना 50 कोटींचे अनुदान
वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ.शरणप्रकाश यांचे उत्तर
बेळगाव : राज्यातील सरकारी आयटीआय कॉलेजना अभ्यासक्रमानुसार यंत्रोपकरणे खरेदीसाठी 50 कोटींचे अनुदान उपलब्ध करून देण्यात आले आहे. खरेदीसाठी निविदा प्रक्रिया सुरू असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण व कौशल्य विकास मंत्री डॉ. शरणप्रकाश पाटील यांनी दिली. सुवर्ण विधानसौधमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी विधानसभेत प्रश्नोत्तर तासात शिरगुप्पाचे आमदार नागराज बी. एम. यांच्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना डॉ. शरणप्रकाश पाटील यांनी वरील माहिती दिली. शिरगुप्पामध्ये 2014-15 मध्ये आयटीआय
कॉलेज मंजूर झाले आहे. शिक्षणासाठी आवश्यक उपकरणे नसल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय झाली आहे, याकडे आमदार नागराज बी. एम. यांनी सरकारचे लक्ष वेधले. राज्यात 90 सरकारी आयटीआय कॉलेजमध्ये डिजिटी नवी दिल्ली यांच्या सुधारित पाठ्याक्रमानुसार आवश्यक यंत्रोपकरणे पुरवण्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. लवकरच ही प्रक्रिया पूर्ण करून यंत्रोपकरणे पुरवण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी सांगितले.