50 दिवसांच्या आंदोलनानंतर बोलिव्हियामध्ये आणीबाणी
वृत्तसंस्था/ ला पाझ
दक्षिण अमेरिकन देश बोलिव्हियाचे राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो पाझ यांनी शनिवारी देशव्यापी आणीबाणी जाहीर केली. 50 दिवसांच्या रस्ते अडवण्याच्या आंदोलनानंतर आणि निदर्शनांनंतर हा निर्णय घेण्यात आला. सरकारने संवादाचे सर्व मार्ग वापरून पाहिले आहेत, परंतु काही गट हिंसाचार आणि अस्थिरता भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे देशव्यापी आणीबाणी लागू केली जात आहे, असे दूरदर्शनवरील भाषणात राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो पाझ परैरा म्हणाले.
देशात मे महिन्याच्या सुरुवातीला निदर्शने सुरू झाली. देशातील सर्वात मोठी कामगार संघटना, बोलिव्हियन वर्कर्स सेंट्रलने (सीओबी) राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो पाझ परैरा यांच्या आर्थिक धोरणांविरोधात आंदोलन सुरू करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. बोलिव्हिया सध्या गेल्या 40 वर्षांतील सर्वात मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. सततच्या रस्ते अडवण्याच्या आंदोलनांमुळे राजधानीसह अनेक शहरांमध्ये इंधन, अन्न आणि औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे.
