सौदी अरेबियात 5 येमेनींना मृत्यूदंड
वृत्तसंस्था / रियाध
सौदी अरेबियात 5 येमेनी नागरिकांना मृत्यूदंड देण्यात आला आहे. या सर्वांवर हत्या करणे आणि लूट करणे असे आरोप होते. या पाच जणांच्या टोळीने अन्य एका येमेनी नागरिकाचाच खून केला होता. तसेच सौदी अरेबियात काही ठिकाणी लूटमार केली होती. कनिष्ठ न्यायालयाने या सर्व पाच आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती. आरोपींनी शिक्षेच्या विरोधात सौदी अरेबियाच्या सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते. पण सर्वोच्च न्यायालयाने हीच शिक्षा कायम केली.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार या सर्वांना शुक्रवारी मृत्यूदंड देण्यात आला. शिक्षा सुनावलेल्या आरोपींचे हात पाठीमागे बांधण्यात आले आणि त्यांना मरेपर्यंत मारहाण करण्यात आली. सौदी अरेबियात अशाच प्रकारे मृत्यूदंड दिला जातो. 2023 मध्ये या देशात अशाप्रकारे 170 जणांना मृत्यूदंड देण्यात आला होता. तर 2024 मध्ये आतापर्यंत 34 जणांना अशाप्रकारे मृत्यूदंड देण्यात आला आहे.
पद्धतीवर आंतरराष्ट्रीय आक्षेप
सौदी अरेबियाच्या मृत्यूदंड देण्याच्या या पद्धतीवर आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेकदा तीव्र आक्षेप नोंदविण्यात आला आहे. ही पद्धत अत्यंत क्रूर आणि अमानवी आहे, असे पाश्चिमात्य देशांचे म्हणणे आहे. ही पद्धत बंद करुन कमी यातना होतील अशा पद्धतीने मृत्यूदंड देण्यात यावा, असा दबावही या देशावर टाकण्यात आला आहे. तथापि, अद्यापही ही पद्धती सोडण्यात आलेली नाही. शरियत कायद्याप्रमाणे ही पद्धती योग्य असल्याचे सौदी अरेबियाचे म्हणणे आहे.