For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सहाव्या टप्प्यात 5 केंद्रीय मंत्री स्पर्धेत

06:22 AM May 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
सहाव्या टप्प्यात 5 केंद्रीय मंत्री स्पर्धेत
Advertisement

लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्याचे मतदान आज शनिवारी होत आहे. या टप्प्यात 58 लोकसभा मतदारसंघ असून 5 महत्वाच्या केंद्रीय मंत्र्यांच्या भवितव्याचा निर्णय हा टप्पा करणार आहे. या मंत्र्यांमध्ये प्रामुख्याने राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. त्यांच्यापैकी अनेक मंत्र्यांना 2021 च्या व्यापक विस्तारात मंत्रीमंडळात स्थान मिळाले आहे. काही तरूण नेत्यांचा समावेशही त्या विस्तारात करण्यात आला होता. बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, हरियाणा आदी राज्यांमधील हे मंत्री आहेत. आता लोकसभा निवडणूक पूर्णत्वाकडे झुकली असून 1 जूनला मतदानाचा सातवा आणि अंतिम टप्पा आहे. सहाव्या टप्प्यातील मंत्री आणि त्यांच्या मतदारसंघांची ही माहिती...

Advertisement

राधामोहन सिंग (पूर्व चंपारण्य मतदारसंघ, बिहार)

Advertisement

? राधामोहन सिंग हे बिहारमधील भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक असून राज्यातील प्रभावशाली राजकारण्यांमध्ये त्यांचा समावेश आहे. त्यांनी भारतीय जनता पक्षाचा पाया या राज्यात भक्कम करण्यात मोठे योगदान दिले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून त्यांचा राजकारणात प्रवेश झाला. त्यांनी भारतीय जनता पक्षात कार्यकर्ता ते महनीय नेता अशी प्रगती 40 वर्षांमध्ये केली आहे.

? बिहारच्या पूर्व चंपारण्य मतदारसंघातून त्यांनी 2014 आणि 2019 अशा दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळविला असून यंदा त्यांना या मतदारसंघातून हॅटट्रिकची अपेक्षा आहे. त्यांचा जनसंपर्क मोठा आहे. ते वैद्यनाथ सेवा संस्था, रिक्षाचालक कल्याण समिती, पंडित दीनदयाळ संस्था अशा अनेक संस्थांशी निगडीत असून त्यांचे समाजकार्य व्यापक प्रमाणात चालते.

? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रथम मंत्रिमंडळापासून ते केंद्रीय मंत्रिमंडळात आहेत. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे उत्तरदायित्व त्यांच्याकडे असून ते त्यांनी अत्यंत कौशल्याने हाताळले असल्याचे दिसते. विशेषत: प्रदीर्घ काळ चाललेल्या शेतकरी आंदोलनात त्यांनी केलेले प्रयत्न महत्वाचे होते. कृषी विभागासंबंधीचा त्यांचा अभ्यास आणि माहितीची नेहमीच प्रशंसा केली जाते.

राव इंद्रजित सिंग (गुरगाव मतदारसंघ, हरियाणा)

?? राव इंद्रजित सिंग हे हरियाणातील पूर्वीच्या रेवाडी संस्थानाच्या यादव संस्थानिकांचे वारसदार आहेत. हरियाणाचे दुसरे मुख्यमंत्री राव बीरेंद्र सिंग यांचे ते पुत्र आहेत. हे मूळचे घराणे काँग्रेसचे आहे. मात्र राव इंद्रजित सिंग यांनी भारतीय जनता पक्षात 2014 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रवेश केला. त्यांनी या पक्षाच्या उमेदवारीवर गेल्या दोन्ही निवडणुकांमध्ये मोठ्या मताधिक्क्याने यश मिळविले.

? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात 2014 मध्ये त्यांचा समावेश करण्यात आला आहे. 1998 ते 2014 पर्यंत ते काँग्रेसचे लोकसभेचे खासदार होते. काँग्रेस सरकारच्या अंतर्गतही त्यांनी वन, वैद्यकीय, पर्यावरण आदी विभागांचे उत्तरदायित्व मंत्री या नात्याने सांभाळले होते. केंद्रीय मंत्रिमंडळातील अनुभवी आणि प्रभावी मंत्री अशी त्यांची प्रसिद्धी आहे. सध्या ते राज्यमंत्री म्हणून काम पाहतात.

? एक उत्कृष्ट नेमबाज अशीही त्यांची ओळख आहे. 1990 पासून 2003 पर्यंत ते भारताच्या शूटींग संघात समाविष्ट होते. त्यांनी राष्ट्रकुल स्पर्धेत कास्यपदक पटकाविलेले आहे. ते ‘स्कीट’ या खेळाचे सलग तीन वर्षे राष्ट्रीय चँपियन होते. हरियाणाचे काँग्रेस मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुडा यांच्यावर त्यांनी विकासात पक्षपात केल्याचा आरोप केल्याने काँग्रेसपासून त्यांना दूर व्हावे लागले.

सुभाष सरकार (बांकुरा मतदारसंघ, पश्चिम बंगाल)

? डॉ. सुभाष सरकार हे पश्चिम बंगालच्या बांकुरा मतदारसंघातून 2019 मध्ये लोकसभेत निवडून आले आहेत. प्रख्यात प्रसूतीतज्ञ म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांचा राजकारणाशी संबंध पुष्कळ नंतरच्या काळात आला असला तरी या ही क्षेत्रात त्यांनी लवकर जम बसविल्याचे दिसून येते. 2021 मध्ये त्यांच्यावर शिक्षण विभागाच्या राज्यमंत्रीपदाचे उत्तरदायित्व सोपविण्यात आले.

? 2019 च्या निवडणुकीत त्यांनी तृणमूल काँग्रेसचे वजनदार उमेदवार आणि पश्चिम बंगालचे मंत्री सुब्रत मुखर्जी यांचा पराभव करुन सर्वांना आश्चर्यचकित केले होते. कारण ते निवडून येतील अशी अपेक्षा कोणत्याही तज्ञाची नव्हती. त्यांनी मुखर्जी यांचा 1 लाखांहून अधिक मतांनी पराभव केला होता. यंदाही त्यांना याच मतदारसंघात भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे.

? लोकसभेचे सदस्य होण्यापूर्वी त्यांनी पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाला बळकटी देण्यात महत्वाचे योगदान दिले आहे. पश्चिम बंगालच्या भारतीय जनता पक्ष शाखेचे उपाध्यक्ष या नात्याने त्यांनी राज्यात पक्षाचा विस्तार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले. सध्या ते 70 वर्षांचे असून या मतदारसंघात ते पुन्हा विजयी होण्याची शक्यता अधिक असल्याचे तज्ञांचे मत आहे. यंदा त्यांचे प्रतिस्पर्धी तृणमूल काँग्रेसचे अरुप चक्रवर्ती हे आहेत.

कृष्ण पाल गुर्जर (फरिदाबाद मतदारसंघ, हरियाणा)

?         कृष्ण पाल गुर्जर हे सध्या केंद्रीय वीज आणि अवजड उद्योग राज्यमंत्री आहेत. हरियाणाच्या फरिदाबाद मतदारसंघातून त्यांनी सलग दोनदा विजय मिळविलेला आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी या मतदारसंघातून 4 लाखांहून अधिक मतांनी विजय मिळविला होता. तर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी आपले मताधिक्क्य 6 लाखांहून अधिक पर्यंत नेले होते.

? यावेळी ते या मतदारसंघात हॅटट्रिकच्या अपेक्षेत असून त्यांचा विजय सोपा मानण्यात येत आहे. 1994 पासून त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून राजकारणाचा प्रारंभ नगरसेवक पदाची निवडणूक जिंकून केला. 1996 मध्ये ते प्रथम हरियाणा विधानसभेचे आमदार म्हणून निवडून आले. 1996 ते 1999 या काळात ते हरियाणामध्ये मंत्रीही होते. नंतर ते हरियाणा शाखेचे अध्यक्ष झाले.

? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रथम मंत्रिमंडळापासून ते केंद्रात मंत्री आहेत. प्रथम त्यांच्याकडे मार्ग परिवहन, राजमार्ग आणि जहाज वाहतूक राज्यमंत्रीपद देण्यात आले होते. 2019 पासून त्यांच्याकडे सामाजिक न्याय आणि अधिकरण राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे. वीज आणि अवजड उद्योग राज्यमंत्री पदाचा भारही त्यांच्यावर सोपविण्यात आला आहे. त्यांचे दोन्ही पुत्रही राजकारणात आहेत.

धर्मेंद्र प्रधान (संभलपूर मतदारसंघ, ओडीशा)

? ओडीशातील भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये धर्मेंद्र प्रधान यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. ते 2014 पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात आहेत. मात्र, प्रथमच ते या राज्यातील संभलपूर मतदारसंघातून लोकसभेची निवडणुकीच्या स्पर्धेत आहेत. आतापर्यंत त्यांची राज्यसभेवर निवड होत असे. तरुण वयात त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून कार्य केले.

? स्वतंत्र भारताच्या इतिहासात सर्वाधिक काळ पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू विभागाचे

कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलेले आहे. त्यांची 2014 मध्ये या विभागाच्या राज्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली होती. 2017 मध्ये त्यांना याच विभागाचे कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले. तेव्हापासून आजवर ते या पदावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘उज्ज्वला योजने’चे श्रेय त्यांनाही समानपणे दिले जाते.

? हायड्रोकार्बन क्षेत्रात नव्या सुधारणा करण्याचे श्रेय त्यांना दिले जाते. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू यांचे देशातील उत्पादन वाढावे म्हणून त्यांनी नवी लायसेन्सिंग पद्धती लागू केली आहे. पेट्रोलियम संशोधन क्षेत्रात अधिक गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी त्यांनी नव्या उपाययोजना केल्या असून त्यांना यश येत आहे. लोकसभा निवडणुकीतही ते यशस्वी होतील, असे तज्ञांचे मत आहे.

Advertisement
Tags :

.